छत्रपती संभाजीनगर : मालकाच्या सांगण्यावरून भिशीचे चार लाख रुपये आणताना जालना रोडवर दुचाकीवरील दोघांनी हिसकावल्याची तक्रार नोकराने जिन्सी पोलिस ठाण्यात गुरुवारी नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास करीत अवघ्या १२ तासांच्या आत फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर फिर्यादीलाच अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता ९ नोव्हेंबरपर्यंच पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती जिन्सीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली.
फरदीन रफिक शेख (२५, रा. दादा कॉलनी, कैलासनगर. ग. नं. ७) असे आरोपी नोकराचे नाव आहे. जिन्सी ठाण्याचे निरीक्षक बुधवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार फरदीन हा आनंद अग्रवाल यांच्याकडे कामाला आहे. अग्रवाल यांना भिशीतून चार लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम आणण्यासाठी त्यांनी फरदीनला शहागंज येथील शाम इलेक्ट्रिक दुकानात पाठविले. तेथून रक्कम घेऊन फरदीन हा अग्रवाल यांच्या अपना बाजारमधील दुकानाकडे निघाला. तो जालना रोडने जात असताना तनिष्क ज्वेलर्ससमोर दोघांनी चाकूच्या धाक दाखवून चार लाख रुपये असलेली पिशवी लंपास केली, अशी फिर्याद फरदीन याने जिन्सी पोलिस ठाण्यात नोंदवली होती.
नियमित पैशांची ने-आण
आरोपी फरदीन शेख याला त्याचे मालक अग्रवाल हे नियमित पैशांचे ने-आण करण्यासाठी पाठवित होते. त्यामुळे फरदीन याने ५ नोव्हेंबरलाच दादा कॉलनीतील त्याच्या दोन साथीदारांसोबत पैसे लंपास करण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे तो पैसे घेऊन जालना रोडवर तनिष्क ज्वेलरसमोर येताच त्याच्या साथीदारांनी चालत्या दुचाकीवरून पैशांची बॅग घेतली आणि निघून गेले. त्यानंतर फरदीनने लुटीचा बनाव रचला आणि जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तक्रार येताच पोलिस अलर्ट
चार लाख रुपये लुटल्याची तक्रार येताच निरीक्षक बुधवंत यांनी सहायक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक गणेश माने यांना तपासाच्या सूचना केल्या. त्यांनी फरदीनची माहिती काढली असता त्याच्यावर दीड लाख रुपये कर्ज असल्याचे समोर आले. अधिक विचारपूस केल्यावर पोलिसांना त्याच्यावरच जास्त संशय बळावला. त्यानंतर वावळे, माने यांच्यासह अंमलदार संदीप सानप, नरेंद्र चव्हाण, भीमराव पवार, संतोष शंकपाळ, सुरेश वाघचौरे, प्राजक्ता वाघमारे यांच्या पथकाने फरदीनला खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

