माजलगाव दि.१२ (प्रतिनिधी): तालुक्यातील हिवरा (बु.) येथे ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात २८ वर्षीय शेतमजूर तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गणेश भारत गाडे (वय २८) रा.हिवरा बु. ता.माजलगाव हे शेतमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी पहाटे सुमारे २ च्या सुमारास ते शेतातील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना शेतातील वळण रस्त्यावर ट्रॅक्टर वळविताना वाहनाचा तोल जाऊन ट्रॅक्टर पलटी झाले. या अपघातात ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले; मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या घटनेमुळे हिवरा (बु.) गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाच्या अचानक निधनामुळे गाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा
