Advertisement

शेतकऱ्यासाठी बच्चू कडू रस्त्यावर

प्रजापत्र | Wednesday, 29/10/2025
बातमी शेअर करा

मुंबई दि.२९ (प्रतिनिधी): शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी उग्र वळण लागले आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी समृद्धी महामार्गावर आक्रमक पवित्रा घेत टायर, लाकूड आणि ज्वलनशील साहित्य जाळत आंदोलन केले. त्यामुळे काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

कार्यकर्त्यांनी सरकार जागे व्हा, शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले. या दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्त्यांच्या संख्येमुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण राहिली.बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र टीका करत म्हटले की, शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास असे आंदोलन राज्यभर उग्र होईल. प्रशासनाने शांतता राखावी आणि शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे.या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर नागपूरकडे येणारी आणि मुंबईकडे जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फौज तैनात केली असून, आंदोलन सुरूच असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement