छत्रपती संभाजीनगर : सुमारे तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' करण्यात आले होते. मात्र, तेव्हा शहरातील रेल्वे स्टेशनचे नामांतर झाले नव्हते. आता आता अखेर तीन वर्षांनंतर रेल्वे स्टेशनचे नाव औपचारिकरित्या ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन’ करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने शनिवारी (२५ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनात या नाव बदलाची घोषणा केली. यासोबतच नव्या स्टेशनचा कोडही (CPSN) जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता. शासनाच्या नामांतरच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिलेला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
केंद्र आणि राज्य सरकारकडून मान्यता
त्यानंतर आता अखेर 'औरंगाबाद' रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर' रेल्वे स्टेशन करण्यात आले आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर स्टेशनवरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून, छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहेत. हे रेल्वे स्टेश दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येते. केंद्रीय रेल्वेच्या निवेदनानुसार, प्राधिकरणाकडून या बदलाला मंजुरी देण्यात आली आहे.
रेल्वे विभागाची अधिकृत माहिती
रेल्वे विभागाने निवेदनात स्पष्ट केले की, “‘Aurangabad’ हे नाव आता कोणत्याही अधिकृत रेल्वे व्यवहारात वापरले जाणार नाही. सर्व अधिकृत नोंदींमध्ये स्थानकाचे नाव ‘Chhatrapati Sambhajinagar’ असेच असेल.”

