बीड दि.१० (प्रतिनिधी): भारत-पाक सीमेवर(beed) वाढत्या तणावामध्ये थेरला गावाचा वीर जवान बाळू अंकुश राख यांना त्यांच्या कर्तव्याची पुकार पोहोचली. सुट्टीत घरी असताना अचानक मिळालेल्या लष्करी आदेशानुसार, त्यांनी सीमेवर परतण्यासाठी प्रस्थान केले. गावकऱ्यांनी अभिमानाने आशीर्वाद देत शुभेच्छा दिला.
बीड जिल्ह्यातील पाटोदा (patoda)तालुकयातील थेरला गावाचा सुपुत्र बाळू राख भारतीय सैन्य दलात देश सेवा बजावत असून काही दिवसापूर्वी आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी तो सुट्टीवर आला होता. परंतु जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांचा जीव घेतला. याचाच बदला भारताना पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला. भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. या तणावाच्या वातावरणात जवानांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या असून, त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार बाळू राख सीमेवर जाण्यासाठी निघाले असता थेरला ग्रामस्थांनी आपल्या या वीर जवानाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत निरोप दिला. यावेळी बाळू राख याचे कुटूंबीय तसेच गावातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.