बीड दि.२४ (प्रतिनिधी)-दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्याची बदनामी राज्यात नव्हे तर देशपातळीवर झाली.कानाकोपऱ्यात बीड जिल्हा गुंडाचा,दहशतीचा,बोगस रॅकेटचा जिल्हा अशी ओळख नंतर या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या मांडलेल्या मुद्द्यामुळेच होत गेली.आता याच ओळखीमुळे म्हणा किंवा एसपींच्या 'कर्तव्यकठोर' भूमिकेमुळे म्हणा बीड जिल्ह्यात बदली झालेल्या एकाही डीवायएसपींना रुजू होण्याची इच्छा राहिलेली नाही.कारण १७ दिवसानंतर ही तीनही अधिकाऱ्यांनी बीडकडे पाठ फिरवल्याने जिल्ह्यात आता नव्याने अधिकारी सरकार पुन्हा देणार आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होतोय.
मागच्या आठ महिन्यांपासून बीड जिल्ह्याची ओळख देशपातळीवर बदनाम जिल्हा अशी झालेली आहे.ही ओळख पुसण्यासाठी विशेष करून पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी टोकाचे प्रयत्न केले आणि अजूनही ते सुरु आहेत म्हणायला हरकत नाही.यात नेमप्लेट असेल,६५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या असतील किंवा क्यूआर कोडसारख्या संकल्पना.खाकीची प्रतिमा बदलण्यासाठी त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबविले.हे सर्व वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरु असताना अवैध धंद्यांवर मात्र त्यांनी मोठी टाच आणण्यासाठी परिश्रम घेतले.जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरु असले आणि त्याची माहिती मिळाली तर त्यांनी तातडीने कारवाई केलीच पण याशिवाय ठाणेप्रमुखाना सुद्धा 'कर्तव्यकठोर' भूमिका घेण्यासाठी वारंवार सूचना केल्या.आज एसपींच्या कठोर भूमिका आणि जिल्ह्याची झालेली बदनामी या दोघांचा परिणाम असेल कदाचित पण जिल्ह्यात तीन पैकी एकही डीवायएसपी काम करायला येण्यासाठी तयार नाही हे वास्तव आहे.७ ऑगस्टला राज्याच्या गृह विभागाने बीडसाठी माणिक विठ्ठलराव बेद्रे,केजला शैलेश सुनील संखे तर माजलगावसाठी शैलेश सुधाकर गायकवाड यांची नियुक्ती केली होती.पण १७ दिवसानंतरही एकही अधिकारी बीड जिल्ह्यात पदभार घेण्यासाठी आला नाही हे विशेष.अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजावर देखील मोठे परिणाम होत असून आता जिल्ह्यात नव्याने अधिकारी सरकार पाठविणार आहे का हे देखील कळायला आजघडीला तरी मार्ग नाही.कारण मागच्या काही महिन्यांपासून पहिले तर आर्थिक गुन्हे शाखा व मुख्यालयाला तर डीवायएसपी मिळालेच नाहीत. त्यामुळे पाच डीवायएसपींच्या रिक्त असलेल्या जागांचा प्रश्न सुटणार तरी कधी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गेवराईच्या डीवायएसपींची बदली पण....
गेवराईचे डीवायएसपी नीरज राजगुरू यांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांचे बदली यादीत नाव आले,पण त्यांना अजूनही जिल्ह्यातून सोडण्यात आलेले नाही.कारण नव्याने बदली झालेल्या तीनही डीवायएसपींपैकी एकही अधिकाऱ्यांनी पदभार घेतला नसल्याने आहेत ते अधिकारी देखील बीड जिल्ह्यातून सोडायचे तर मग काम करायचे कसे असा प्रश्न घटकप्रमुखांपुढे निर्माण होत आहे.
अप्पर पोलीस अधीक्षकांबाबत ही संभ्रम
बीडचे अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांचा देखील जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झाल्याचे सांगितले जाते.सचिन पांडकर यांनी आपल्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात कौतुकास्पद काम केले.शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख आतापर्यंतच्या कामातून राहिली.बीड जिल्ह्यातील आगामी निवडणुका पाहता अनुभवी असलेल्या सचिन पांडकर यांना सहा महिन्यांची आणखी मुदतवाढ मिळेल असे अपेक्षिले जात आहे.पण त्याबाबतही अजून निर्णय झालेला नाही.विशेष म्हणजे एकीकडे अधिकारी बीड जिल्ह्यात येण्यासाठी तयार नसताना दुसरीकडे आहेत ते अधिकारी काम करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना तरी संधी मिळायला हवी अशी देखील चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.