Advertisement

विशेष लेख- समाजसंघटक

प्रजापत्र | Wednesday, 13/08/2025
बातमी शेअर करा

समीर लव्हारे
 
समाजाला जात, धर्म, वंश या पलिकडे जाऊन मानवतेच्या धाग्याने जोडण्याचे काम संत करत असतात. या संत परंपरेत महाराष्ट्रातील अनेकांचे योगदान आहे. संत भगवानबाबा त्यात अग्रस्थानी आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून समाजाला संघटीत करून त्याला मानवतेच्या मार्गावर नेण्याचे काम संत भगवानबाबांनी केले. ज्यांना स्वत: पंडित नेहरूंनी प्रथम राष्ट्रसंत म्हणून गौरविले असे भगवानबाबा खर्‍या अर्थाने समाजसंघटक म्हणूनच परिचित राहतील. आज त्यांच्या जातीपातीपलिकडच्या विचारांची समाजाला खर्‍या अर्थाने गरज आहे.

 
बीड जिल्हा आणि लगतच्या काही जिल्ह्यांना संत विचारांचा मोठा वारसा राहिलेला आहे. विशेषत: मराठवाड्यात संत परंपरेच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे जे काम झाले ते काम म्हणजे एकाच वेळी संघटन, प्रबोधन आणि परिवर्तन अशा त्रिसूत्रीचा अनुभव देणारे होते. संत भगवानबाबांची एकूणच कारकिर्द या तीन संकल्पनांना मूर्त रूप देत समाजाला घडविणारी राहिलेली आहे.
खरे तर संतांच्या जाती पाहण्याचा नतदृष्टपणा मागच्या एक दोन दशकात सुरू झाला आहे. मुळातच महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा पाहिली तर ते जातीव्यवस्थे विरूध्दचे बंड होते. ज्ञानेश्‍वर, तुकाराम, नामदेव, गोराबाकाका, कान्होपात्रा, जनाबाई, सावता महाराज, सेना महाराज अशा सर्वच संतांनी ते ज्या जातीत जन्मले त्या एका जातीपुरते न राहात सार्‍या समाजाच्या उध्दाराचा विचार केला आणि खर्‍या अर्थाने जाती तोडोची संकल्पना या संत विचारांमधूनच रूजली गेली. त्याच विचारांचे पाईक आणि वारसदार म्हणून संत भगवानबाबा यांचे कार्य राहिले आहे. संत म्हणजे केवळ भजन, किर्तन, मोक्ष, मुक्ती इतक्याच मर्यादेत न राहता समाजाला खर्‍या अर्थाने विकसित करण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते ओळखून त्या दिशेने समाजाला नेणारा मार्गदर्शक या भूमिकेतून संत भगवानबाबांचा संपूर्ण आयुष्याचा प्रवास राहिला. कधीच कोणत्याच एका जातीच्या लौकीक चौकटीत ना ते स्वत: राहिले ना तत्कालीन समाजव्यवस्थेने त्यांना त्या चौकटीत बांधले होते. भगवानबाबांची गुरू परंपरा पाहिली तरी हे सहज लक्षात येते आणि पुढे त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून जे भिमसिंह महाराज घडविले त्यावरूनही त्यांचा जातीभेदापलिकडचा दृष्टिकोन अधिकच प्रकर्षाने जाणवतो. धुंडामहाराज देगलूरकर, प्राचार्य सोनोपंत दांडेकर, विनोबा भावे, बाळासाहेब भारदे, डॉ.के.पी.सोनवणे हे सारे भगवानबाबांच्या विचार विनिमयाच्या बैठकीमधले. यांच्या बाबांसोबत अनेकदा बैठका व्हायच्या. विनोबांच्या भूदान चळवळीत भगवानबाबांनी सक्रीय सहभाग नोंदविलेला. म्हणजे एका अर्थाने समाजिक क्रांतीची जी बिजे वेगवेगळ्या कालखंडात महाराष्ट्रात रोवली गेली त्या सामाजिक क्रांतीचे बीजारोपण करणारे अग्रदूत म्हणून देखील भगवानबाबांकडे पहावे लागेल.

महाराष्ट्रातल्या उपेक्षितांच्या उध्दारासाठी अध्यात्म, शिक्षण या माध्यमातून प्रबोधनाचा दीप घेवून चाललेल्या या व्यक्तीचा महिमा पंडित नेहरूंच्या कानावर गेला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण केंद्रात मंत्री होते. यशवंतरावांकडून पंडित नेहरूंनी भगवानबाबांबद्दलची सारी माहिती घेतली आणि बाबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यशवंतरावांच्या निमंत्रणावरून भगवानबाबा दिल्लीत गेले आणि तेथे त्यांची आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट झाली. त्या भेटीत बाबांचे कार्य पाहून पंडित नेहरूंनी त्यांना ‘तुम्ही राष्ट्रसंत आहात’ असे म्हणत त्यांचा गौरव केल्याचे सांगितले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भगवानबाबा यांच्या भेटी झाल्याचेही दाखले आहेत. हे सारे संदर्भ देण्याची आवश्यकता आज यासाठी पडत आहे की एकूणच समाज व्यवस्थेत जाती-पातीची विषवल्ली जाणिवपूर्वक पसरविली जात आहे. अशावेळी या मातीचा वारसा नगदनारायणाची परंपरा घेवून समाज जोडणार्‍या भगवान बाबांचा आहे हे लक्षात येणे आवश्यक आहे.
भगवान बाबांनी त्यांच्या कार्यकाळात जी वेगवेगळी संस्थाने सुरू केली त्यावर नजर टाकली तरी बाबांचे समाज जोडण्याचे कार्य कोणत्या उंचीचे होते हे सहज लक्षात येते. मंठा जिल्हा जालना येथील अंबोरा संस्थान, पाथरीमधील ब्राम्हणगाव संस्थान, गेवराईचे रामेश्‍वर संस्थान, माजलगाव तालुक्यातील हरिश्‍चंद्र पिंप्री संस्थान, बीड तालुक्यातील मोहनीराज जवळा संस्थान, केज मधील तांबवा संस्थान, सारूळचे विठ्ठलगड संस्थान, मादळमोहीचे विठ्ठलगड संस्थान अशी कितीतरी अध्यात्मिक संस्थाने आणि गड भगवान बाबांच्या प्रेरणेतून आणि सक्रीय सहभागातून उभे राहिलेले आहेत. यातील कोणतेच संस्थान कोणत्या एका जातीसाठी तयार झालेले नव्हते. तर एकूणच समाजाला प्रगतीच्या, आत्मउन्नतीच्या दिशेने घेवून जाण्याच्या उदात्त हेतून समाजसंघटनाची एक वेगळी चळवळ भगवान बाबांनी सुरू केली होती. ती चळवळ पुढे नेण्याचे दायित्व आता खर्‍या अर्थाने भगवान बाबांचे भक्त म्हणविणार्‍या आपणा सर्वांचे आहे.

 

 

Advertisement

Advertisement