मुंबई दि.२९(प्रतिनिधी):राज्यात पावसाचा जोर दि. २९ जूनपासून वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईसह कोकणपट्टीत आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टी, संपूर्ण कोकण आणि सह्याद्रीच्या घाटभागात दि. २९ जून ते दि. २ जुलै या काळात पावसाचा जोर वाढेल.
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या हवामान प्रणालीमुळे दि. १ आणि दि. २ जुलै या कालावधीत तळकोकण, गोवा तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर लक्षणीय असेल. हवामान अभ्यासकांच्या मते, २ ते ९ जुलै या काळात कोकण (मुंबई आणि एमएमआर परिसरासह), उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केवळ ३ ते ६ दिवसांच्या कालावधीत काही भागांत ५०० मिलीमीटर इतका पाऊस होईल. हा पाऊस मुंबईकरांना गेल्यावर्षीच्या दि. १६ ते दि. २० ऑगस्टच्या पावसाची आठवण करून देणारा ठरू शकतो.दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर जास्त राहणार असल्याने विशेषतः मुंबई, कोकण आणि घाटभागातून प्रवास करताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे.
अतिमुसळधार पावसाचे कारण : मध्य प्रदेशवर दि. २ जुलैच्या सुमारास मान्सूनचा पहिला तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो नैऋत्येकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच दि. ४ जुलैच्या सुमारास बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. या दोन्ही प्रणाली मान्सूनच्या ट्रफमुळे एकमेकांशी जोडल्या जातील आणि पाऊस सक्रिय होईल.
मुंबई व आसपासच्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात या काळात चांगला पाऊस होईल. यामुळे धरणांमधील पाणी पातळीत २५ ते ४० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याचे पहिले दोन आठवडे देशभरात पावसाच्या दृष्टीने उत्तम राहतील. या काळात मान्सूनचा हा नवीन प्रवाह संपूर्ण भारताला व्यापण्याची शक्यता आहे. सध्या गोव्यापासून केरळपर्यंत समुद्रात ढगांची दाट गर्दी पाहायला मिळत असून, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी ही अनुकूल स्थिती आहे.
- अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

