धाराशिव दि.१४(प्रतिनिधी): जिल्ह्यातील ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता आकाशाची मर्यादा राहिलेली नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नासास्थळीय परीक्षेत अंतिम निवड झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व २० गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा (NASA) येथे भेट देण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे. पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना ही अविस्मरणीय संधी उपलब्ध होत आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्राथमिक, धाराशिव यांच्या नासास्थळीय परीक्षेतील अंतिम निवड यादीत भूम, परंडा, धाराशिव, उमरगा, कळंब, लोहारा, तुळजापूर आणि वाशी या तालुक्यांतील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. काही विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान यांसारख्या विषयांतही विशेष प्रावीण्य मिळवले आहे.लहानशा गावातील शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर नासापर्यंतचा प्रवास निश्चित केला आहे. त्यांच्या डोळ्यांत असलेली अंतराळाची स्वप्ने आता प्रत्यक्ष नासाच्या प्रगत अवकाश संशोधन सुविधांना पाहताना साकार होणार आहेत. रॉकेट, उपग्रह, अंतराळ संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि मानवाच्या अंतराळातील भवितव्याचा जवळून परिचय या विद्यार्थ्यांना होणार असल्याने त्यांच्या ज्ञानविश्वाला निश्चितच नवी दिशा मिळणार आहे.“ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता आणि प्रतिभेची अजिबात कमतरता नाही; गरज आहे ती त्यांच्या स्वप्नांना योग्य व्यासपीठ आणि संधी देण्याची. धाराशिवच्या या २० विद्यार्थ्यांची नासाभेट ही त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय पर्व ठरेल. या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून उद्याचा वैज्ञानिक भारत घडताना मला पाहायचा आहे,” अशी भावना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.धाराशिवच्या मातीतील या २० ‘चांदण्यांना’ आता अंतराळाच्या विश्वाची सफर घडणार असून, त्यांच्या स्वप्नांना नासाच्या आकाशाची जोड मिळणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारी ही संधी जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासातील निश्चितच अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना ठरणार आहे.

