नांदेड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ‘खरीप हंगाम २०२६’साठी पीक विमा अर्ज दाखल करण्यात नांदेड जिल्ह्याने मराठवाड्यासह महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली असून, यंदा तब्बल ५ लाख ३७ हजार ७५५ शेतकऱ्यांनी ९ लाख ४८ हजार ४६२ अर्ज दाखल केले आहेत. या विक्रमी प्रतिसादातून जिल्ह्यातील ६ लाख १८ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे भक्कम सुरक्षा कवच मिळाले आहे. विशेष म्हणजे, यंदा १ लाख ३ हजार २५५ नव्या शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे.
सुरुवातीला या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक भागांत पावसाअभावी झालेली उशिराची पेरणी आणि पीक विमा पोर्टलवर आलेले तांत्रिक अडथळे, यामुळे हजारो शेतकरी अर्जांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून राज्य शासनाने १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आणि मुदतवाढ मिळताच जिल्ह्यात विमा अर्ज भरण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. शेवटच्या दिवसापर्यंत आलेल्या अर्जांच्या या महापुराने नांदेडला राज्यात पहिल्या स्थानावर नेऊन ठेवले. राज्यातील पीक विमा अर्जांच्या आकडेवारीत नांदेडपाठोपाठ मराठवाड्यातीलच बीड जिल्ह्याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. बीडमधील ३ लाख ६१ हजार ८९ शेतकऱ्यांनी ४ लाख २२ हजार ५७० हेक्टर क्षेत्र संरक्षित केले. विशेष म्हणजे, नांदेड जिल्ह्यात गतवर्षी ४ लाख ३४ हजार ५०० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. यंदा त्यात तब्बल १ लाख ३ हजार २५५ नव्या शेतकऱ्यांची भर पडली आहे. तर राज्यात यंदाच्या खरीपात एकूण ८१ लाख २८ हजार २७२ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. वाढती नैसर्गिक संकटे आणि प्रशासनाने दिलेली मुदतवाढ यामुळे यंदा पीक विमा योजनेला हा ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला आहे.
पहिल्या पाच जिल्ह्यांत मराठवाड्याचा डंका
राज्यात पीक विमा नोंदणीत अव्वल ठरलेल्या पहिल्या पाचही जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये नांदेड अव्वल स्थानी असून, त्या पाठोपाठ बीड, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेडमध्ये ५ लाख ३७ हजार ७५५ शेतकऱ्यांनी ९ लाख ४८ हजार ४६२ अर्ज दाखल केले. त्या पाठोपाठ बीड जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ८९ शेतकऱ्यांनी ९ लाख ३५ हजार १८३ अर्ज, लातूरमध्ये ३ लाख ९ हजार ६१४ शेतकऱ्यांचे ६ लाख २१ हजार ८९५ अर्ज, धाराशिवमध्ये २ लाख ८० हजार ७१९ शेतकऱ्यांचे ४ लाख ७९ हजार २३१ अर्ज, तर परभणी जिल्ह्यात २ लाख ८० हजार ४६३ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार ४५६ अर्ज भरत लाखो हेक्टरवरील पिकांना सुरक्षा कवच दिले आहे.
रत्नागिरी जिल्हा नोंदणीत सर्वांत मागे
‘खरीप हंगाम २०२६’मध्ये पीक विमा नोंदणीच्या बाबतीत कोकणातील रत्नागिरी जिल्हा राज्यात सर्वांत तळाशी राहिला आहे. जिल्ह्यातील अवघ्या ४ हजार ६४८ शेतकऱ्यांनी १० हजार ४२ अर्जांद्वारे पिकांचा विमा उतरवला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास, विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक भरपाई मिळणे कठीण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वाधिक अर्ज संख्या असलेले जिल्हे :
जिल्हा - शेतकरी संख्या - अर्ज संख्या - संरक्षित क्षेत्र (हेक्टर)
नांदेड - ५,३७,७५५ - ९,४८,४६२ - ६,१८,५६०
बीड - ३,६१,०८९ - ९,३५,१८३ - ४,२२,४७०
लातूर - ३,०९,६१४ - ६,२१,८९५ - ४,०७,८३०
धाराशिव - २,८०,७१९ - ४,७९,२३१ - ४,०७,१४०
परभणी - २,८०,४६३ - ५,२३,४५६ - ३,५८,९४०

