पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत २८ जून रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ (टीईटी) या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
परीक्षा परिषदेने या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ (टीईटी) घेण्याचे प्रस्तावित होते. नीट २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या.तथापि, आज (२७ जून) पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षेच्या जून २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेने दिली.सदर परिस्थिती लक्षात घेता २८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.शिक्षक पात्रता परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
टीईटी परीक्षेत गैरप्रकार होण्याच्या घटना या पूर्वी घडल्या होत्या. २०१८ आणि २०१९मध्ये झालेल्या परीक्षेत काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून काहींना अटक केली होती. तसेच गैरप्रकारात सहभागी ९ हजारांहून अधिक उमेदवारांची संपादणूक रद्द करण्याची कारवाईही करण्यात आली होती.

