Advertisement

 संपादकीय अग्रलेख - केवळ ट्रेंड नव्हे खदखद

प्रजापत्र | Saturday, 23/05/2026
बातमी शेअर करा

'कॉकरोच जनता पार्टी'वरून मागच्या चार दिवसात देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या अकाउंटला ज्या पद्धतीने फॉलोवर मिळाले त्यावरून हा उपहासात्मक प्रयोग भलताच यशस्वी झाला याबद्दल देखील कोणतेच दुमत नाही. खरेतर 'कॉकरोच जनता पार्टी' म्हणजे काही कोणतेही नियोजनबद्ध असे संघटन नाही, तर ही केवळ तात्कालिक प्रतिक्रिया आहे. तात्कालिक प्रतिक्रियांचे आयुष्य किती असेल यावर भाकीत करणे अवघड असते आणि बहूतांष वेळा या प्रतिक्रिया जितक्या वेगाने उसळतात, तितक्याच वेगाने ओसरतात देखील, मात्र याची जाण असताना देखील येथील व्यवस्थेला 'कॉकरोच जनता पार्टी'चे समाज माध्यमावरचे खाते बंद करावे लागते यावरूनच या उपहासाचा तीव्रता किती आहे याचा अंदाज बांधता येईल. 'कॉकरोच जनता पार्टी' ही तात्कालिक प्रतिक्रिया असेल, मात्र या प्रतिक्रियेमागे देशातील एकूणच व्यवस्थेबद्दलचा असंतोष, चीड, खदखद,अस्वस्थता हे सारे काही दडले आहे.
 

देशाच्या सरन्यायाधीशांनी या देशातील सुशिक्षित बेरोजगार आणि व्यवस्थेला प्रश्न विचारू पाहणाऱ्या तरुणाईला 'झुरळ' म्हणून हिणवावे हे खरेतर या व्यवस्थेच्या प्रतिष्ठेलाच कमीपणा आणणारे होते. ज्या व्यवस्थेने नाहीरे वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही भूमिका घ्यावी, त्या व्यवस्थेच्या प्रमुखाची तरुणाईबद्दलची ही मानसिकता कोणालाच पटणारी नव्हती. आपल्या या विधानावरून नंतर सरन्यायाधीशांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांची एकूणच उपेक्षितांबद्दलची मानसिकता उघडी पडली ती पडलीच. त्यांच्या या मानसिकतेला देशातील तरुणाईने 'कॉकरोच जनता पार्टी'च्या उपहासात्मक प्रयोगातून जे उत्तर दिले,ते उत्तर म्हणजे या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे.
खरेतर 'कॉकरोच जनता पार्टी'हा समाजमाध्यमांमधला एक ट्रेंड. आभासी जगातील हा ट्रेंड इतक्या वेगाने वाढला यावरूनच आपल्या सध्याच्या व्यवस्थेबद्दल सामान्यांच्या मनात किती राग,चीड,अविश्वास,अस्वस्थता आणि खदखद आहे हे सहज लक्षात येऊ शकते. येथील व्यवस्था जर उपेक्षितांना झुरळ समजत असेल
तर हीच झुरळे व्यवस्थेला घाम फोडू शकतात हे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या ट्रेंडने दाखवून दिले. खरेतर 'कॉकरोच जनता पार्टी' हे काही कोणते संघटित किंवा सूत्रबद्ध संघटन नाही. प्रत्यक्षात या नावाने काही हजार लोक एकत्र आलेत आणि त्यांचे काही असे राजकीय उद्देशाने जाळे तयार झाले असेही नाही. मुळातच ज्या अभिजित दिपके यांनी हा ट्रेंड सुरु केला,त्या दिपके यांच्या कुटुंबीयांनी 'राजकीय भूमिकेपासून' दूर राहण्याची व्यक्त केलेली अपेक्षा हे सारे तात्कालिक आहे हे सांगायला पुरेशी आहे. असेही एखाद्या घटनेवरून ज्या तात्कालिक प्रतिक्रिया उमटतात,त्यावरून लगेच भविष्याची मांडणी करता येत नसते. मात्र समाजमनात नेमके काय चालले आहे हे समजायला अशा तात्कालिक प्रतिक्रियांचा उपयोग होऊ शकतो आणि समाजमनाचा आरसा म्हणून 'कॉकरोच जनता पार्टी'कडे पाहता येईल.
आज देशभरातील तरुणाई अस्वस्थ आहे. आज त्या तरुणांसमोर स्वतःचे असे मोठे प्रश्न आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य आदी सर्वच क्षेत्रांमध्ये आज अस्वस्थता आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडलेले आहेच, मात्र तरुणाईला कायम त्यांच्या जगण्या मरण्याच्या मुख्य मुद्द्यांकडून जे भरकटवले जाते ते कोठे तरी तरुणाईला खटकते आहे. ही व्यवस्था आपल्याला झुरळ समजते याचा राग 'कॉकरोच जनता पार्टी'च्या प्रयोगातून समोर आला. आज देशभरात विद्यार्थी अस्वस्थ आहे, तरुण बेरोजगार होऊन भविष्याच्या चिंतेत आहे, शेती आणि शेतकरी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे, लोकशाही आणि संविधानाने निर्माण केलेल्या कोणत्या व्यवस्थेवर विश्वास ठेवावा असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. अगदी न्यायव्यवस्थेच्या संदर्भाने देखील न्या. यशवंत वर्मांपासून ते अगदी काल परवाच्या रोहिणी कोर्टातील व्हिडिओपर्यंत एकूणच विदारक परिस्थिती समोर आलेली आहेच. इथली व्यवस्था लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य असलेल्या परीक्षा देखील 'नीट' घेऊ शकत नाही हे सारे अस्वस्थ करणारे आहे आणि ही अस्वस्थताच 'कॉकरोच जनता पार्टी'च्या माध्यमातून समोर आलेली आहे. सत्ताधारी असोत व विरोधक, सर्वानीच ही अस्वस्थता वेळीच समजून घ्यावी इतकीच अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement