लातूर दि.२५(प्रतिनिधी): सुगंधी तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औसा ते लामजना रस्त्यावर पकडला या कारवाईत आयशर टेम्पो जप्त करण्यात आला असून एकूण ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दि. २५ जुलै रोजी पहाटे सुमारे ४.१० वाजता लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे एका आयशर टेम्पोमधून गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या आयशर टेम्पो TS 12 UE 4190 चालकासह दोन इसमाना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे
१)मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा),२)रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा)
अशी सांगितली. टेम्पोमध्ये कोणता माल आहे, याबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. झडतीदरम्यान टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.या कारवाईत विविध लेबल असलेले सुगंधी तंबाखूची पोती,राजरत्न किमाम नावाचे काचेचे डबे असा एकूण २८ लाख ९७ हजार ६० रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला. याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेला आयशर कंपनीचा टेम्पो क्र. TS 12 UE 4190, अंदाजे ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा, असा एकूण ४० लाख ४७ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाणे गुन्हा क्र. ४२०/२०२६, कलम १२३, २७५, २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, हा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल कोठून आणण्यात आला, कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती याचा पुढील तपास औसा पोलिसांकडून करण्यात येत आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे,तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांनी केली.

