परळी : आजारपणावर उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाच्या हतबलतेचा गैरफायदा घेत चोरट्याने हातसाफ केल्याचा संतापजनक प्रकार परळी उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आला आहे. हाताचा एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या ५७ वर्षीय महिलेच्या पर्समधून तब्बल ६७ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात भामट्याने लंपास केले. ही घटना १० ऑगस्ट रोजी सकाळी घडली असून, तब्बल महिनाभरानंतर १६ सप्टेंबर रोजी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मला शंकर चव्हाण (वय ५७, मूळ रा. सायखेडा, ता. सोनपेठ, सध्या रा. साईनगर, परळी) या हात दुखत असल्याने उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात आल्या होत्या. डॉक्टरांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून गळ्यातील सोन्याचे सरपाळे, कानातील फुलझोड, कानातील साखळी-जोड आणि सोन्याचे मंगळसूत्र काढून स्वतःच्या पर्समध्ये सुरक्षित ठेवले होते. मात्र, तपासणीच्या गडबडीत अज्ञात चोरट्याने ती पर्सच लांबवली.पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेला धक्का बसला. पर्समध्ये ६७ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने होते. घटनेनंतर महिला गंभीर आजारी असल्याने त्यांना तातडीने पोलिसांत धाव घेता आली नाही. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रभारी पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळासाहेब चव्हाण पुढील तपास करत आहेत.

