Advertisement

दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं टोकाचं पाऊल

प्रजापत्र | Saturday, 09/05/2026
बातमी शेअर करा

 अकोला  : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल ८ मे शुक्रवारी दुपारी जाहीर झाला.  यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 92.9 टक्के लागला आहे. असे असताना परीक्षा म्हटल्यावर प्रत्येकाला त्यात यश येईलच असे देखील नाही. अनेकांना यात अपयश देखील येत असतं. मात्र पुन्हा परीक्षेची तयारी करून त्यात यश मिळवण्याची हमी नक्कीच असते. पण त्यासाठी स्वतःवर विश्वास आणि अभ्यासाची तयारी तितकी हवी. मात्र तात्पुरतं अपयश इतकं मोठं समजून यात काही विध्यार्थी अगदी टोकाचा दुर्दैवी निर्णय घेत असतात. असाच एक खळबळजनक प्रकार अकोला (Akola Crime News) शहरातून समोर आला आहे. अपेक्षेप्रमाणे कमी गुण मिळाल्यामुळे नागपूर संभाजीनगर आणि धारावीनंतर आता अकोला जिल्ह्यातही शालेय विद्यार्थ्यांने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे अकोल्यात एका विद्यार्थ्यांने टोकाचं पाऊल उचललं आहे. 'विठ्ठल संतोष बोर्डे' असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा अकोला जिल्ह्यातील शिंगोली गावातील रहिवासी आहे. त्याने कारंजा रमजानपूर येथील धरणात उडी घेत आत्महत्या केलीय. 'अगली बार आऊंगा, सबका मनपसंद बन कर' अशाप्रकारे सोशल मीडियावर स्टेट्स विठ्ठलने ठेवत, हा टोकाचा निर्णय घेतलाय. या घटनेने अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत राज्यात दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे 4 विद्यार्थ्यांची आत्महत्या केली असून यात 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार विठ्ठलला 69 टक्क्यांवर गुण मिळाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अकोलासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.दहावीच्या निकालात सोलापूरची एक विद्यार्थिनी सध्या विशेष चर्चेत आली आहे. कारण या विद्यार्थिनीला प्रत्येक विषयात नेमके 35 गुण मिळाले आहेत. निकिता कुचेकर असं या विद्यार्थिनीचं नाव असून तिच्या या अनोख्या निकालाची शहरभर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे निकिताने हे यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं आहे. अनेक दिवसांपासून ती आरोग्याच्या समस्यांचा सामना करत होती. त्याचबरोबर घरची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे. तिचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. चंडक प्रशालेतील शिक्षकांनी तिला शिक्षणाचं महत्त्व पटवून देत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केलं. परीक्षेच्या काळात तब्येत ठीक नसतानाही निकिताने प्रत्येक पेपर दिला. अखेर सर्व विषयात 35 गुण मिळवत तिने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. प्रत्येक विषयात समान म्हणजेच 35 गुण मिळाल्याने निकिता कुचेकर हिच्या निकालाची सध्या सोलापुरात जोरदार चर्चा होत आहे.

Advertisement

Advertisement