Advertisement

हायवा चालक आणि दुचाकीस्वार यांच्यातील वाद ठरला जीवघेणा

प्रजापत्र | Tuesday, 14/04/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.१४ (प्रतिनिधी): तालुक्यातील सिरसदेवी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर घडलेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा मृत्यु झाला आहे. माजलगावकडून गढीकडे जात असलेला हायवा सिरसदेवी येथे आल्यानंतर चालकाने दुचाकीस्वाराला कट मारल्याची घटना घडली.
या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी दुचाकीस्वार भागवत सखाराम कांबळे (वय 35)वर्ष, रा. सिरसदेवी यांनी हायवा चालकाला थांबवले असता वाद निर्माण झाला. या वादाच्या दरम्यान संतापलेल्या हायवा चालकाने थेट कांबळे यांच्या अंगावर वाहन घातल्याची गंभीर घटना घडली. यात कांबळे यांचा सोमवार (दि.१३) रोजी रात्री जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांचा वाढता धुडगूस पुन्हा एकदा समोर आला आहे. “अशा प्रकारे निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना प्रशासन नेमके काय करत आहे?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मृत भागवत कांबळे यांच्या पश्चात पत्नी, लहान मुले आणि वृद्ध आई-वडील असा परिवार असून, कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अवैध वाळू माफियांवर तात्काळ आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement