Advertisement

संपादकीय अग्रलेख- अस्वस्थ राष्ट्रवादी,अस्थिर राजकारण  

प्रजापत्र | Friday, 03/04/2026
बातमी शेअर करा

 अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर लगेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सुनेत्रा पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीने राजकीय 'सतर्क'ता दाखवून दिली होती. मात्र आता त्याच राष्ट्रवादीत अजित पवारांच्या जाण्यानंतर काही काळातच मोठ्याप्रमाणावर अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीवर नियंत्रण नेमके कोणी ठेवायचे यावरून ही रस्सीखेच असल्याचे प्रथमदर्शनी भासत असले तरी राजकारणात नेहमीच दिसते किंवा भासते तसे असतेच असे नाही. मात्र राष्ट्रवादीमधील या अस्वस्थतेमुळे अनेकांचे राजकारण अस्थिर झाले आहे.
 
       काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामुळे राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेली धुसफूस समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांच्या जाण्यानंतर सारे काही आलबेल आहे असे भासविण्याचा प्रयत्न होत असले तरी तेथे सारे काही 'मस्त चाललंय आमचं ' धाटणीचे काही सुरु नाही हे मागच्या काळात वारंवार दिसून आले आहे. तसे तर अजित पवार हयात असतानाही राष्ट्रवादीमध्ये सारे काही 'सुरळीत' होते असे नाही. अगदी अजित पवारांसमोर देखील पटेल, तटकरे यांचे आव्हान म्हणता नाही आले तरी डोकेदुखी का होईना होतीच. अर्थात त्याला कसे सामोरे जायचे हे अजित पवारांना माहित होते. अजित पवारांच्या अकाली जाण्याने पक्षासमोर नेतृत्वाचा पेच तर होताच, त्याशिवाय दुसऱ्या राष्ट्रवादीमधून हा पक्ष हायजॅक केला जाईल ही भीतीही होतीच. ही भीती तशी सुनेत्रा पवारांना होतीच, कारण यापूर्वीच शरद पवारांनी त्यांना 'बाहेरच्या पवार ' ठरवल्याचा अनुभव त्यांच्या गाठीला होता, मात्र सुनेत्रा पवारांपेक्षा देखील पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाची भीती पक्षातील पटेल, तटकरे यांच्यासारख्या नेत्यांना अधिक होती. हिंदीमध्ये 'तख्त की चिंता बादशहासे ज्यादा वजीर को होती है ' असे सांगितले जाते , त्या न्यायाने अजित पवारानंतर पुढे काय हे त्या पक्षातील सर्वांनाच वाटणे साहजिकच. त्यातूनच मग तातडीने सुनेत्रा पवारांचा शपथविधी उरकण्याची 'सतर्कता ' दाखविली गेली. हे करताना सुनेत्रा पवार यांना राजकारणातले समाजात असले तरी त्या आपल्या कलाने घेतील असे कोणाला वाटले असल्यास त्यात नवल किंवा आश्चर्य देखील काहीच नाही. मात्र काही दिवसातच सुनेत्रा पवारांचे राजकारण पक्षातील सर्वांनाच समजू लागले असून त्यामुळेच राष्ट्रवादीमधील एका गटात मोठी अस्वस्थता आहे. बरे हा जो गट आहे, त्यात प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे , यांचा काही राज्यात स्वतःचा असा 'मासबेस' नाही. तटकरेंचा प्रभाव कोकणातल्या काही भागात, तर पटेलांचे 'प्रभावक्षेत्र'च वेगळे , त्यामुळे त्यांच्यात आणि आमदार , कार्यकर्ते यांच्यात देखील एक अंतर आहेच. कदाचित हेच अंतर सुनेत्रा पवारांना देखील लक्षात आले असावे. त्यातच मागच्या काळात राष्ट्रवादीला रुपाली चाकणकर यांच्यापासून ते नरहरी झिरवाळ यांच्यापर्यंत अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. रुपाली चाकणकर यांचा पक्षात वाढलेला 'प्रभाव ' कसा होता हे देखील कदाचित सुनेत्रा पवारांना समजले असावे आणि म्हणून देखील पक्षाला शिस्त लावण्यासोबतच 'स्वतःच्या ' कलाने चालविण्याचे त्यांनी ठरविले असावे असे दिसते. डिझाईन बॉक्सच्या अरोरांना बाहेरचा रास्ता दाखवून सुनेत्रा पवारांनी ते दाखवून दिले आहेच.
मागच्या काळात प्रफुल्ल पटेल  आणि सुनील तटकरेंच्या संदर्भाने समाजमाध्यमे आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील खूप काही बोलले जात आहे. त्यावरून पक्षातील अस्वस्थता लक्षात येते. या चर्चा किंवा बातम्या निराधार आहेत असे आता जरी खा. पार्थ पवार यांना सांगावे लागत असले तरी सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेलांचे नसणे किंवा मंत्रालयात पटेलांची आणि सुनेत्रा पवारांची भेट टळल्याचे व्हिडीओ व्हायरल होणे या गोष्टी खूप काही सांगून जात आहेत. मात्र आता राष्ट्रवादीमधील ही अस्वस्थता अनेकांच्या राजकारणाला अस्थिर करणारी ठरत आहे. राष्ट्रवादीमध्ये पटेल, तटकरे अस्वस्थ झाले म्हणजे ते दोघेच अस्वस्थ होतील असे समजणे राजकीय अज्ञानाचे ठरेल.ही  अस्वस्थता पक्षाला कोणत्या वळणावर नेऊन ठेवेल हे आज सांगता येणार नाही. कारण राष्ट्रवादी आज भाजपच्या संगतीला आहे, आणि मित्र पक्षांमधील अस्वस्थतेचे काय करायचे किंवा मित्र पक्षांना कसे अस्वस्थ करायचे याचे भाजपचे राजकारण देशाने अनुभवले आहे. त्यामुळे आता या अस्वथतेचे राजकीय परिणाम काय होतात यावर अनेक राजकीय समीकरणे बदलतील,मात्र येत्या काळात उलथापालथ होणार आहे हे नक्की.

 

Advertisement

Advertisement