Advertisement

बापाचा खून करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रजापत्र | Monday, 30/03/2026
बातमी शेअर करा

आष्टी दि.३० (प्रतिनिधी): कडा बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटे उघडकीस आलेल्या पित्याच्या खून प्रकरणाचा आष्टी पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला आहे. आईला होणारी मारहाण आणि रोजच्या कौटुंबिक वादाला कंटाळून १९ वर्षीय मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी करण अनिल मुळे याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथून ताब्यात घेतले. 

   मूळचे पिसादेवी,जि.छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले हे कुटुंब कडा येथे भंगार गोळा करून उदरनिर्वाह करत होते.मृत अनिल सजन मुळे (वय ५०) हे दारूच्या नशेत रोज पत्नीला मारहाण आणि मुलाला त्रास देत असत. रविवारी रात्री देखील घरात मोठा वाद झाला होता. या रोजच्या भांडणामुळे मुलगा करण प्रचंड संतापला होता. सर्वजण झोपल्यानंतर करणने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा जीव घेतला. हत्येनंतर त्याने तातडीने कडा येथून पळ काढला आणि खुलताबाद गाठले.घटनेची माहिती मिळताच आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी तपास पथके रवाना केली. पो.ह.प्रवीण क्षीरसागर, भाऊसाहेब आहेर आणि बब्रुवाण वाणी यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधून काढले. पोलीस पथकाने तातडीने खुलताबाद येथे धाव घेऊन आरोपी करणला बेड्या ठोकल्या. गुन्ह्याची कबुली त्याने दिली असून कौटुंबिक छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले.

  

Advertisement

Advertisement