अंबाजोगाई तालुक्यात एका अल्पवयीन (१५ वर्षीय) मुलाने आपल्याच नात्यातील अवघ्या २ वर्षाच्या चिमुरडीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराची घटना हादरवणारी आहे. समाजमाध्यमांमध्ये अगदी सहजपणे प्रसारित होणारे अश्लील व्हिडीओ पाहून त्याने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. त्यामुळेच आता अडनिड्या वयातील पिढीच्या हातात जो सोशल मीडिया अगदी सहज उपलब्ध झाला आहे, त्या सोशलमिडीयातील हिडीसपणाबद्दल गांभीर्याने विचार करण्याची आणि या असल्या हिडीसपणावर नियंत्रणाची आवश्यकता अधिक गंभीरपणे समोर येत आहे.
सध्या सोशल मीडियाच्या कोणत्याही भिंतीवर पाहायचे म्हटले तर हिडीसपणाचा कहर झालेला दिसत आहे. कोणाच्याही कसल्याही चित्रफिती अगदी बिनदिक्कतपणे प्रसारित करताना यातून आपण कोणाची बदनामी करीत आहोत याचे भान तर कोणाला राहिलेले नाही, पण त्यापलीकडे जाऊन आपण सोशल मीडिया हातात असणाऱ्या पिढीला नेमके काय देत आहोत याचीही चिंता करताना कोणी दिसत नाही. खरात प्रकरणात या प्रकरणाचा निषेध करण्यापेक्षा त्या खरातचे कथित व्हिडीओ पाहणारी संख्या फार मोठी आहे, म्हणजे समाजातील आंबट शौकीनपणा सध्या सोशल मीडियाचे प्रमुख आकर्षण झाला आहे. खरातचेच म्हणून नाही, तर असले कोणतेही प्रकरण उजेडात आले की 'त्याचे व्हिडीओ आहेत का' असे पूर्वी खाजगीत विचारले जायचे,आता समाज माध्यमांच्या भिंतीवरच ते बिनदिक्कतपणे लटकावले जात आहेत आणि त्याला मोठ्याप्रमाणावर व्ह्यू मिळत आहेत. मागच्या आठवडाभरात खरात असेल किंवा झिरवाळ, असल्या कथित व्हिडिओंनीच समाजमाध्यमांच्या भिंती भरलेल्या होत्या. हे सारे करताना एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचा आपल्याला अधिकार कोणी दिला इतका विचार करण्याचे भान कोणाकडे राहिलेले नाही,पण असल्या प्रकारांच्या होणाऱ्या सामाजिक परिणामांचे काय?
आज मोबाईलमधील क्रांतीमुळे असेल किंवा कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे असेल अगदी आठ दहा वर्षाच्या लेकरांच्या हातात देखील मोबाईल आलेला आहे, आणि ती पिढी इतकी हुशार आहे की मोबाईलचे कोणतेही पासवर्ड त्या पिढीला अगदी सहज कळतात. त्यामुळे मोबाइलसोबतच साहजिकच सोशल मीडियाची दारे देखील या पिढीसाठी उघडी झाली आहेत. सोशल मीडियावर स्वतःचे खाते सुरु करण्यासाठी सध्यातरी फार काही लागत नाही, त्याच्यामुळेच कितीतरी फेक खाती जशी उघडली जातात तशीच मोठ्याप्रमाणावर अल्पवयीन लेकरांची खाती देखील उघडली गेली आहेतच. आता त्यांच्यासमोर सोशलमिडियातील हा हिडीसपणाच रोजच येणार असेल तर त्याचे परिणाम काय होणार? माणूस जे ऐकतो, त्यापेक्षा अधिक जे पाहतो ते त्याच्या लक्षात जास्त राहत असते असे म्हणतात,मग रात्रंदिवस केवळ आणि केवळ अश्लिलताच या लेकरांना पाहायला मिळणार असेल तर काय? समाजमाध्यमानवर मजकूर टाकताना खरेतर असल्या व्हिडिओंबद्दल काही ठोस नियम आखण्याची आवश्यकता आहेच, पण त्यावर कोणीच गंभीर नाही हे देखील तितकेच खरे. त्यातूनच मग अडनिड्या वयातील लेकरांनी वेगळी वाट चोखाळली तर त्याची जबादारी कोणावर? अंबाजोगाई तालुक्यात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या नात्यातल्या २ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करावा या मागची त्याची विकृत मानसिकता नेमकी कोठून निर्माण झाली? बरे हे काही असले पहिले प्रकरण नाही, तर मागच्या काळात अश्या घटना वाढत असताना पाहायला मिळत आहेत. मग यातून समाजस्वास्थ्यालाच जो धोका निर्माण झाला आहे त्याचे काय? असेही सोशलमिडिया अनियंत्रित झालेला आहेच. येथे चांगले काही सांगण्यापेक्षा ट्रोलर्सच्या झुंडी तयार झाल्या आहेत. या झुंडी सामाजिक स्वास्थ्य बिघडवायला कारणीभूत ठरत असतानाच आता या माध्यमामध्ये कोणी काय पोस्ट करावे याला कसलाच धरबंध राहिलेला नाही, पोस्ट करणाराला भान नाही आणि पाहणारांना देखील भान किंवा जाण नाही असा सारा नागडा कारभार सध्या सोशलमिडीयावर सुरु आहे आणि त्यातून ज्या पिढीने आणखी जग काय ते पाहिलेले नाही, ज्यांना लैंगिकता काय असते ते माहित नाही, त्या पिढीला वेगळ्या वळणावर नेण्याचे काम यातून होत आहे. त्यामुळेच या हिडीसपणाला कठोर निर्बंध लावणे ही काळाची गरज आहे.

बातमी शेअर करा
