Advertisement

वनविभागाचे कृत्रिम पाणवठे कोरडेठाक

प्रजापत्र | Thursday, 12/03/2026
बातमी शेअर करा

बीड: उन्हाचा पारा वाढत असतानाच बीड तालुक्यातील करचुंडी वनक्षेत्रात वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वनविभागाने तयार केलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने हरिण, मोर, वानर यांसारखे वन्यप्राणी पाण्यासाठी आता मानवी वस्त्यांकडे आणि गावतलावांकडे धाव घेत आहेत. यामुळे वन्यजीवांचे प्राण धोक्यात आले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

  करचुंडी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बेलगाव, पिंपरनई, फुकेवाडी आणि सोमनाथवाडी परिसरात वनविभागाने अनेक कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. मात्र, कडक उन्हामुळे हे पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. ज्या ठिकाणी पाणी शिल्लक आहे, तिथे महिनाभरापासून पाणी बदलले नसल्याने मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले आहे. हे अस्वच्छ पाणी प्राण्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.

 

कुत्र्यांच्या हल्ल्याचा आणि अपघाताचा धोका
पाण्याच्या शोधात वन्यजीव जंगलाबाहेर पडत असल्याने त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनांच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. "वनविभागाने केवळ नावापुरते पाणवठे न ठेवता त्यात नियमितपणे स्वच्छ पाणी सोडावे," अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी वनविभागाकडे केली आहे.

Advertisement

Advertisement