Advertisement

 २० गुणांच्या मुलाखतीत सामान्य ज्ञानासाठी केवळ ३ गुण               

प्रजापत्र | Saturday, 28/02/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२७ (प्रतिनिधी):-ज्या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता असते, त्या पात्रतेवरच परीक्षेतील मूल्यांकन अपेक्षित असताना, दहावी उत्तीर्ण ही पात्रता असलेल्या पोलीस पाटील पदाच्या मुलाखतीसाठी अधिकच्या शिक्षणाला अधिकचे गुण देण्याचा अजब विवेकी निर्णय बीडच्या जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये देखील कधी असे गुणांकन केले जात नाही,तरीही समान संधीच्या तत्वाला हरताळ फासत केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांवर अन्याय करणारा हा निर्णय प्रशासन का रेटत असून २० गुणांच्या मुलाखतीमध्ये सामान्य ज्ञानासाठी केवळ ३ गुण ठेवण्यात आले आहेत.
     बीड जिल्ह्यातील पोलीस पाटलांव्या रिक्त पदांच्या भरतीसाठी सध्या प्रक्रिया सुरू आहे.यासाठीची ८० गुणांची लेखी परीक्षा रविवारी (दि.२२) घेण्यात आली असून आता मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे.२० गुणांच्या मुलाखतीसाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी गुणांकनाचे ‘विवेकी‘ सूत्र जाहीर केले आहे.त्यानुसार पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असली तरी मुलाखतीमध्ये दहावी उत्तीर्णसाठी ५ गुण,पुढे बारावी आणि पदवीसाठी प्रत्येकी ३ गुण,पोलीस पाटील वारस आणि माजी सैनिक किंवा गृहरक्षक दलातील जवानांसाठी अधिकचे गुण आणि प्रत्यक्ष मुलाखतीत सामान्य ज्ञानासाठी केवळ ३ गुण ठेवण्यात आले आहेत.

 
समान संधीच्या तत्वाला हरताळ
कोणत्याही भरतीसाठी समान संधीचे तत्व म्हत्वाचे असते.पोलीस पाटील भरतीसाठी दहावी हीच पात्रता असेल तर त्याच पात्रतेवर गुणांकन व्हायला हवे. अधिकच्या शैक्षणिक पात्रतेला अधिकचे गुण देण्याचा निर्णय हा दहावी उत्तीर्णांवर अन्याय करणारा ठरणार आहे.लोकसेवा आयोगाच्या परीक्षा जेव्हा होतात, त्यावेळी शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शिक्षण असणारे उमेदवार देखील अर्ज करतात,मात्र आयोग अशा अधिकच्या पात्रतेसाठी वेगळे गुण देत नाही.कदाचित इतका ‘विवेक’लोकसेवा आयोगांच्या अधिकाऱ्यांना नसावा

 
जाहिरातीत उल्लेख आहे का?
पोलीस पाटील यांचे वारस आणि माजी सैनिक किंवा गृहरक्षक दलातील जवानांना प्राधान्य किंवा अधिकचे गुण याचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला होता का? आणि नसेल तर जिल्हाधिकारी ऐनवेळी असे निर्णय का लादत आहेत असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

 
निवड समित्या कशासाठी
साधारणतः प्रत्येक पदासाठी जी निवड समिती असते ती निवड समिती परीक्षेचे स्वरूप आणि प्रक्रिया ही प्रचलित नियमानुसार ठरवित असते.पोलीस पाटील पदासाठी नियुक्ती प्राधिकारी हे उपविभागीय अधिकारी असतात.निवड समितीचे अध्यक्ष देखील उपविभागीय अधिकारी आहेत.मात्र गुणांकनासह सर्व नियम जिल्हाधिकारी ठरविणार असतील तर निवड समित्या आहेत तरी कशासाठी हा मुद्दा देखील आहेच.

 
पोलीस पाटील वारस किंवा माजी सैनिक नसतील तर…
पोलीस पाटील पदासाठी प्रत्येक गावाच्या पातळीवर निवड होणे अपेक्षित आहे.त्यामुळे एखाद्या गावात पोलीस पाटलांचे वारस किंवा माजी सैनिक अथवा गृह रक्षक दलातील जवान उपलब्धच नसतील तर तेथील गुणांकन १४ गुणांचेच करायचे का? का तेथे सामान्य ज्ञानासाठी निवड समिती जास्त गुण देवू शकणार आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात काही निर्देश दिले आहेत का?

Advertisement

Advertisement