Advertisement

संपादकीय अग्रलेख -कोल्ह्याला द्राक्षे आंबट

प्रजापत्र | Wednesday, 18/02/2026
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी (अर्थातच अजित पवारांची) आपल्याला सामावून घ्यायला फारशी उत्सूक नाही हे आता शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला चांगलेच लक्षात आलेले आहे. ज्यांच्या सोबत चर्चा झाल्या तेच हयात नसल्याने आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आपल्याला पायघड्या घालणारे कोणीच नाही हे जयंत पाटलांपासून रोहित पवारांपर्यंत सर्वांनाच कळून चुकले आहे आणि म्हणूनच आता विलीनीकरणाचा विषय संपला आहे. इथपासून ते आमचा स्वतंत्र पक्ष आहे इथपर्यंतची विधाने करण्याची वेळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांवर आलेली आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणण्यासारखा हा प्रकार आहे. 
   

राज्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पाडून भाजप सोबत सत्तेचा संसार सुरू केला. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच ताबाही मिळवला आणि ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) ही वेगळी चुल मांडत पुन्हा राजकारणाची ‘तुतारी’ फुंकावी लागली. त्यावेळी स्वत: शरद पवारांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत अनेकांनी काय काय विधाने केली होती. पक्ष चोरल्याचे, घर फुटल्याचे काय काय आरोप केले होते हे सारे आता इतिहास झालेले असले तरी महाराष्ट्र हा इतिहास विसरलेला नाही. लोकसभा निवडणूकीत अगदी शरद पवारांनी देखील ‘बाहेरच्या पवार’म्हणत कोणाच्या विरोधात कोणत्या पातळीवरचा प्रचार केला होता हे किमान सुनेत्रा पवार तरी विसरणे शक्य नाही. 
या सार्‍यांचा उहापोह यासाठी करायचा की अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन सुरू असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाच्या नेत्यांकडून अजित पवारांसोबत बंद दाराआड काय काय चर्चा झाल्या आणि कसे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार होते याबाबत मुलाखती देणे सुरू झाले होते. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ तरी उशिरा घेतली, त्याही अगोदर राष्ट्रवादी (श.प.) च्या सर्वच नेत्यांना विलीनीकरणाची घाई झाली होती. अजित पवारांनी सर्व काही ठरविले आहे हे जोर लावून सांगितले जात होते. 
‘प्रजापत्र’ने यापूर्वीच्या अग्रलेखामधूनही विलीनीकरणाची गरज असलीच तर ती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आहे. अजित पवार गटासाठी आता शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे विनाकारणचा वाटेकरी असणार हे मांडले होते. मागच्या 15 दिवसात ज्या घडामोडी घडल्या, त्यातून तेच समोर येत आहे. राष्ट्रवादीचे सुनिल तटकरेंपासून सारेच नेते विलीनीकरणाबाबत काहीच कल्पना नाही आणि आम्ही भाजप सोबतच आहोत असे वारंवार सांगत आले आहेत. त्यातही आम्ही एनडीए सोबत आहोत मग इतरांना आमच्या सोबत यायचे असेल तर विचार करू असे सांगत एका अर्थाने आमच्या अटीवर यायचे तर या हाच संदेश राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून ठामपणे दिला गेला. जी राष्ट्रवादी सध्या सत्तेत आहे त्यांना खरे तर आणखी कोणाला सोबत घेवून आपल्या मंत्रीपदामध्ये आणि सार्‍याच सत्ता पदांमध्ये वाटेकरी होवू देणे रुचणार नाही. तसेच विलीनीकरणानंतर एकाच पक्षात अनेक सत्ताकेंद्रे निर्माण होणे देखील सुनेत्रा पवारांना देखील रुचणारे नाही. पार्थ पवारांपासून सुनेत्रा पवारांपर्यंतचे झालेले पराभव कदाचित व्यापक राजकारणाचा भाग म्हणून अजित पवारांनी दृष्टीआड केले असतेही पण तिच भुमिका आता सुनेत्रा पवार आणि पार्थ घेतील असे समजणे म्हणजे राजकीय भाबडेपणा ठरेल. एव्हाना हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते असलेल्या सर्वांनाच समजून चुकले आहे. खरे तर सत्तेशी सोयरिक करण्याची घाई आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील झालेली आहेच. अजित पवार काही सत्ता सोडून विरोधात बसण्यासाठी विलीनीकरणाला तयार होणार नव्हते त्यामुळे जर विलीनीकरणाच्या बैठका झालेल्या असतील तर त्या साहजिकच शरद पवार गटालाही सत्तेसोबत जाण्यासाठीच झाल्या होत्या. हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांच्या पक्षात आपल्याला स्विकारार्हता नाही हे लक्षात आल्यामुळे जयंत पाटलांपासून रोहित पवारांपर्यंत सर्वांनाच आमचा स्वतंत्र पक्ष आहे याची झालेली जाणीव कोल्ह्याला द्राक्षे आंबट या म्हणीची आठवण करून देणारी आहे. 

Advertisement

Advertisement