Advertisement

संपादकीय अग्रलेख- हा कोणता अजेंडा ?

प्रजापत्र | Monday, 16/02/2026
बातमी शेअर करा

खरेतर एखाद्या महापालिकेत टिपू सुलतानचे छायाचित्र लावावे की नाही हा वादाचा मुद्दाच व्हायला नको,इतर सर्व महापुरुषांचे,राष्ट्रीय व्यक्तिमत्वाचे फोटो का नाहीत यावर चर्चा करता आली असती,मात्र भाजपला राज्यात कायम कोणताही मुद्दा धार्मिक अंगानेच न्यायचा असतो,त्यांनी टिपू सुलतानच्या छायाचित्राचेही तेच केले.आता त्यावरून पुण्या  सारख्या शहरात दगडफेक आणि गोंधळ होणार असेल तर सत्ताधाऱ्यांचा अजेंडा नेमका काय आहे आणि विरोधीपक्ष म्हणवणारा काँग्रेस त्या अजेंड्यात अडकत आहे का ?
 
एखाद्या महापालिकेतील एखाद्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात ज्यांना संविधान मान्य आहे अशाना काहीच गैर वाटण्याचे काहीच कारण नाही.मात्र त्या दालनात संबंधितांनी इतर महापुरुषांचे फोटो लावले नाहीत हे नक्कीच आक्षेपार्ह आहे.त्यावर चर्चा होऊ शकतात,किंबहुना सरकारी कार्यालयांमध्ये कोणती छायाचित्रे आवश्यक आहेत,त्याचे जे काही निकष आहेत,त्याचे पालन व्हायला हवे असा आग्रह देखील केला जाऊ शकतो.मात्र भाजपला इतर छायाचित्रांशी फारसे देणेघेणे असण्याचे कारण नाही.त्यांना कसेही करून टिपू सुलतान हा वादाचा मुद्दा करायचा आहे.टिपू सुलतानाचे सुलतान असणे एकदा ठसठशीतपणे समोर आणले की अनेकजण इतिहासाची फारशी माहिती न घेताही भावनेच्या भरात काहीही करायला तयार असतात यहे भाजपवाल्यांना चांगले माहित आहे. त्यामुळेच त्यांना कसेही करून हा विषय भावनिकतेकडेच न्यायचा असतो,ते काम भाजपने केले.
मूळ प्रश्न असा आहे की विरोधीपक्ष भाजपच्या या ट्रॅप मध्ये सातत्याने का अडकतो ? टिपू सुलतानच्या छायाचित्राचे समर्थन करताना काँग्रेसला ते वेगळ्या पद्धतीने करता आले असते.त्यासाठी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याची आवश्यकता नव्हती. मुळातच वेगवेगळ्या काळातील ऐतिहासिक व्यक्तिरेखांची तुलना करणे आजच्या काळात अश्क्यापर्यय झालेले आहे,कारण त्या तुलना समजून घेण्याइतकी समज,संवेदनशीलता आणि सहिष्णुता आज कितीशी उरली आहे हा मोठा प्रश्न आहे? भावनेच्या लाटेवर स्वर होण्यातच धन्यता मानणाऱ्या समाजमाध्यमी पिढीला कोणत्याच इतिहासही देणेघेणे उरलेले नाही आणि त्याच पिढीच्या अस्मितांना गोंजारून भाजपचे राजकारण सुरु असते,त्यामुळे भाजप कायम अशा समित्यांना गोंजारण्याची संधी शोधात असतो.काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून ती संधी भाजपला आयती दिली. मुळात कोणत्याच ऐतिहासिक व्यक्तिरेखांना कोणत्याही तुलनेनी आवश्यकता नसतेच. टिपू सुलतानाचे इंग्रजांविरोधी लढ्यात मोठे योगदान होते, तसेच शृंगेरीच्या मठाला संरक्षण देण्यात देखील मोठे योगदान होते,हा इतिहास जरी सांगितला असता आणि भारतीय संविधानाची जी मूळ प्रत आहे,ज्यात देशउभारणीत मोलाचे योगदान असणाऱ्या व्यक्तींची चित्रे रेखाटण्यात आली आहेत,त्यात टिपू सुलतानच्या छायाचित्राचाही समावेश आहे हे वास्तव सांगून देखील भागले असते.ज्यांना इतिहास समजून घ्यायचा नाही किंवा वास्तव स्वीकारायचे नाही,त्यांचे या गोष्टींनी समाधान झालेच नसते हे मान्य,पण त्यामुळे त्यांना किमान हा मुद्दा पुन्हा भावनिकतेच्या वाटेवर तरी नेता आला नसता.काँग्रेसला भाजपच्या भावनिक राजकारणाची ही खेळी ओळखावी लागणार आहे.जोपर्यंत काँग्रेसला ही तिरकी चाल समजत नाही, तोपर्यंत काँग्रेस कायम भाजपच्या अजेंड्यामध्येच ट्रॅप होत राहणार.आता याच विषयावरून पुण्यात तोडफोड झाली,काही लोकांची डोकी फुटली,भाजप हा विषय सहज सोडून देणारच नाही,त्यातून त्यांचा स्वतःचा असा राजकीय फायदा आहेच, मात्र त्या ट्रॅप मध्ये अडकून काँग्रेस काय मिळविणार आहे ?
प्रतिगाम्यांशी लढताना,अस्मितांचे खेळ करणारांशी दोन हात करताना कधीच सध्या चाली चालून जमत नसते,तिरक्या चालिला शाह द्यायचा असेल तर तितक्याच बेरकीपणाने द्यावा लागतो,देशातल्या विरोधीपक्षांना अजूनही हे समजत नाही,त्यामुळेच भाजपवाल्यांचे कायम फावत आले आहे.त्यांना जनतेच्या अस्मितांना थेट हात घालता येतो,त्यासाठी ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करताना देखील त्यांना काही वाटत नाही,मात्र त्याच सामान्यांच्या अस्मिता ओळखण्यात आणि त्या अस्मितांना त्यांच्या पद्धतीने सामोरे जाण्यात विरोधीपक्ष कमी पडत आले आहेत. भाजप जे काही करतोय ते योग्य आहे असे मुळीच नाही, पण भाजपला उत्तर देताना योग्य ती चाल चालण्यात विरोधीपक्ष कमी पडत आहेत हे नक्की.

Advertisement

Advertisement