Advertisement

परळी थर्मलचे दोन संच तातडीने बंद करा

प्रजापत्र | Tuesday, 10/02/2026
बातमी शेअर करा

 बीड दि. ९ (प्रतिनिधी ) : सातत्याने सूचना देऊनही पर्यावरण नियमांचे पालन केले जात नसल्याचा ठपका ठेवत परळीच्या थर्मलला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोठा दणका दिला आहे. या थर्मलमधील दोन संच (क्र ६ आणि ८ ) तातडीने बंद करण्याचे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. याचा परळीच्या एकूणच अर्थकारणावर गंभीर परिणाम होणार आहे.
परळीच्या थर्मलच्या मागे मागच्या काही काळापासून शुक्लकाष्ठ लागल्याचे चित्र आहे. या थर्मल मधील अनेक संच या अगोदरच बंद झाले आहेत. तर अनेकदा विजेची मागणी नसल्याने देखील सुरु असलेले संच बंद ठेवण्याची वेळ येत असते. त्यातच आता थर्मलकडून पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवत थर्मलमधील दोन संच तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या थर्मलसाठी दिलेल्या पर्यावरण मंजुरी देखील काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 

यापूर्वीच झाले होते संच बंद करण्याचे आदेश
परळी थर्मलमधील संच क्रमांक ६ आणि ८ बंद करण्याचे आदेश यापूर्वीच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. मात्र ते आदेश असतानाही हे दोन संच सुरूच होते. मंडळाकडून या थर्मलची मे २०२५ मध्ये पाहणी झाली, त्यावेळी बंद करण्याचे आदेश असलेले संच सुरूच असल्याचे निदर्शनास आले . त्यानंतर आता तातडीने हे संच बंद करून अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

 
अनेक गंभीर अनियमितता
परळी थर्मलच्या संदर्भाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक गंभीर अनियमिततांवर बोट ठेवले आहे.थर्मलने प्रदूषण नियंत्रणासाठी उभारलेली यंत्रणा अपुरी असणे, पाणी आणि राख यावर प्रक्रिया न करताच ते सोडणे , राखेच्या वापराबाबत पुरेशी काळजी न घेणे यासह सुमारे ९ ते १० मुद्द्यांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे.
 

 

मुंडे बहीण भावांनी  लक्ष घातल्यास निघेल मार्ग   
राज्याच्या पर्यावरण विभागाचे मंत्रिपद पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनीही परळीच्या अर्थकारणाच्या दृष्टीने म्म्हत्वाच्या असलेल्या थर्मलकडे यापूर्वी देखील लक्ष दिलेले आहे. प्रशासकीय बाबी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जर थर्मलचे संच बंद ठेवण्याची वेळ येणार असेल तर यातून परळीकरांचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे आणि आ. धनंजय मुंडे यांनी यात लक्ष घातले आणि त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी आ. धनंजय मुंडेंनी पाठपुरावा केला आणि मंत्री पंकजा मुंडेंनी केंद्राकडे रदबदली केली तर यातून मार्ग निघू शकेल.

Advertisement

Advertisement