कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील सर्वच वनक्षेत्रात ३० डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत पर्यटकांना (Panhala Forest Ban) बंदी करण्यात आली आहे. वनविभागाने नाकाबंदी व रात्रीच्या गस्तीचे नियोजन केले असल्याची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वन अधिकारी अजित माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, पन्हाळा तालुका डोंगराळ असल्याने येथील वनक्षेत्रही मोठे आहे. या समृद्ध वनक्षेत्रात विपुल दुर्मीळ वनस्पती आहेत. तसेच वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बिबट्या, गवे व अन्य वन्यजीवांचे वास्तव्य आहे.अलीकडील काळात जंगल भागात सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा पर्यटकांकडून वनक्षेत्रात चूल मांडून जेवण करणे, मद्यपान करणे, वणवा लावणे, शिकार करणे, गोंधळ करणे असे प्रकार घडतात. त्यामुळे वनसंपत्ती नष्ट होते.या प्रकारांना आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या आदेशानुसार, पावनगड, पन्हाळा व मसाई पठारासह तालुक्यातील वनक्षेत्रात ३० डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत प्रवेशबंदी केली आहे. या कालावधीत संपूर्ण तालुक्यातील वनक्षेत्रात नाकाबंदी व रात्रीची गस्त घातली जाणार आहे.

