Advertisement

अवैध अफू लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रजापत्र | Thursday, 12/02/2026
बातमी शेअर करा

धाराशिव दि.१२(प्रतिनिधी): वाशी तालुक्यातीलदशमगाव शिवारात अवैध अफू लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अफूची झाडे जप्त केली. या कारवाईत सुमारे ४८५.६९ किलो वजनाची अफूची झाडे अंदाजे ५२ लाख ४८ हजार ९७० रुपयांच्या किमतीची जप्त करण्यात आली आहेत.

       बुधवार (दि ११)रोजी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सर्वे क्रमांक १६३,दशमगाव येथे छापा टाकला असता कांद्याच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून अफूची लागवड केल्याचे आढळून आले. संबंधित शेत हे समाधान मनोहर उंडे रा. दशमगाव, ता. वाशी, जि. धाराशिव यांचे असल्याचे निष्पन्न झाले.नायब तहसीलदार व शासकीय पंचांच्या उपस्थितीत कारवाई करून पांढऱ्या-गुलाबी रंगाची फुले व मोठी बोंडे असलेली अफूची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाणे वाशी येथे गुन्हा क्रमांक ४५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) सह १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इंगळवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधर्शन कासार व पथकाने केली.अवैध अमली पदार्थांच्या लागवडीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement