बीड दि.१२ (प्रतिनिधी): शहरातील पेठ बीड परिसरातील पाडुरंग नगर भागात घरात घुसून एका महिलेला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हातात काठ्या आज दगड घेऊन महिला थेट दुसऱ्या एका घरात घुसतांना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करत घरात घुसलेल्या महिलांनी त्या ठिकाणी असलेल्या एका वृद्ध महिलेला मारहाण केली. त्यानंतरही मोटरसायकलवर आलेले पाच ते सहा जण घरात घुसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सरील व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दोन्ही घर समोरासमोर असून शेजारी असलेल्या एका घरातील महिलांसह इतरांनी बाजूच्या घरात जाऊन हा हल्ला केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या वादाच्या प्रकरणात पेठ बीड पोलीस ठाण्यात एका गटाकडून विनयभंगाची तक्रार दाखल झालेली आहे. दुसऱ्या गटाकडून मात्र या प्रकरणात अद्याप तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

