बीड दि.१४(प्रतिनिधी) : फायनान्स कंपनीत काम करताना शिकलेल्या वाहन उचलण्याच्या कौशल्याचा वापर करून दुचाकी चोरी करणाऱ्या आणि त्या ‘बँकेने जप्त केलेल्या गाड्या आहेत’ असे सांगून विकणाऱ्या सराईत चोराचा बीड शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत कृष्णा उमेश अंतरकर (वय २५, रा. शिवशक्ती नगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

बीड शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विशेष पथकाद्वारे तपासाचे आदेश दिले होते. बीड शहर ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँचने (DB) तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी कृष्णा अंतरकर (वय २५, रा. शिवशक्ती नगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर) हा पूर्वी एका फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करत असे. हप्ते थकवलेल्या गाड्या ओढून आणण्याचे (रीपोझेशन) काम करताना त्याला गाड्या कशा लॉक न करता चालू करायच्या किंवा न्यायच्या, याचे कौशल्य प्राप्त झाले होते. याच कौशल्याचा गैरवापर करत त्याने बीडमधून गाड्या चोरण्यास सुरुवात केली. चोरी केलेल्या गाड्या तो पाथर्डी परिसरात नेत असे. तिथे तो स्वतः फायनान्स किंवा बँकेत कामाला असल्याचे सांगून, “हप्ते थकल्यामुळे या गाड्या जप्त केल्या आहेत, स्वस्तात मिळतील,” अशी बतावणी करायचा. त्याच्या या थापांना बळी पडून अनेक नागरिकांनी पैसे देऊन गाड्या विकत घेतल्या. आता पोलिसांनी गाड्या जप्त केल्यामुळे खरेदीदारांचे पैसे आणि गाडी दोन्ही गेले असून, त्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.या कारवाईत शिवाजीनगर आणि बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.

