Advertisement

गोपीनाथ मुंडेंची सोशल इंजीअनिरिंग : जाणीव आणि उणीव

प्रजापत्र | Friday, 12/12/2025
बातमी शेअर करा

 एखाद्या व्यक्तीच्या नसण्याने केवळ राजकारणावरच नव्हे तर एकूणच समाजकारणावर आणि सामाजिक स्वास्थ्यावर काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव आज बीड जिल्ह्यात प्रकर्षाने होऊ शकते.आपल्या एकूणच राजकीय,सामाजिक जीवनात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी जपलेली आणि वाढवलेली सामाजिक इंजिनिअरिंग म्हणा किंवा सामाजिक व्यापकता म्हणा,या जिल्ह्यात एक सामाजिक एकोपा बांधून ठेवणारी ठरली होती.आज कोठेतरी या सामाजिक एकोप्यालाच तडा गेलेला असल्याने गोपीनाथ मुंडेंच्या व्यक्तिमत्वाची जाणीव आणि ते नसल्याची उणीव प्रत्येकालाच भासत असणार हे नक्की.
 
    बीडच्या मातीत जन्मलेले गोपीनाथ मुंडे हे एक वेगळेच रसायन होते.अगदी साध्या,सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती,त्यावेळी मोजक्या समूहाचा म्हणविल्या जाणाऱ्या पक्षात जातो काय आणि तेथून बहुजन विचारांचे राजकारण,समाजकारण करताना,त्या संपूर्ण पक्षाच्याच तोंडवळा बदलतो काय,हे राजकारणातले मोठे आश्चर्य होते.हे करताना गोपीनाथ मुंडेंनी एकूणच महाराष्ट्राच्या राजकारण,समाजकारणाचा चेहरा बदलला हे देखील वास्तव आहे.समजतील प्रत्येक समाजघटकाला हा चेहरा आपला वाटायचा अशी सामाजिक बांधणी त्यांना करता आली होती.
महाराष्ट्राच्या काय किंवा देशाच्या काय,राजकारणात जात आणि जातीचे प्राबल्य हे काही नवीन नाही.अगदी परिवर्तनवादी विचारांचे अधिष्ठान सांगतानासुद्धा 'जिसकी जितनी संख्या भारी,उसकी उतनी भागीदारी ' हे भारताच्या राजकारणाचे सूत्र झाले होतेच.त्यामुळे जाती आधारित राजकारण हा आपल्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनलेला आहेच,मात्र असे असतानाही ज्यांना जातीच्या चौकटीत बांधता येणार नाही असे नेतृत्व म्हणूनच महाराष्ट्र गोपीनाथ मुंडेंकडे पाहत आला होता.ते ज्या जिल्ह्यातून आले त्या बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात त्यांनी सोशल इंजिनिअरिंगचे अनेक प्रयोग केले.बीड जिल्ह्यात राजकीय विजनवासात गेलेल्या काही कुटुंबांना राजकारणात पुन्हा स्थैर्य देताना गोपीनाथ मुंडेंना त्या कुटुंबांची जात कधी खटकली नाही. पाशा पटेल यांच्यासारखा लढवय्या चेहरा शोधून त्याला राजकारणात मोठेपण देताना भाजपचे असलेल्या गोपीनाथ मुंडेंना कधी पटेल यांचा धर्म आडवा आला नाही. अगदी राज्याच्या पातळवीर गरज पडली त्यावेळी उदयनराजे भोसले यांच्यासाठी देखील गोपीनाथ मुंडेंनी मदतीचा हात दिला होताच. मोहिते पाटील कुटुंबाला देखील त्यांनी काही काळ भाजपच्या प्रवाहात आणले होतेच. या नावाचा उल्लेख यासाठी करायचा, की ओबीसींचे नेते म्हणून ओळख निर्माण होत असतानाच गोपीनाथ मुंडेंना कधी महाराष्ट्रात बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजाचे वावडे नव्हते. म्हणूनच मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमांना सहज हजेरी लावताना, मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना त्यांना कधी अवघडल्यासारखे झाले नाही, किंवा या समाजाला देखील कधी गोपीनाथ मुंडेंची उपस्थिती खटकली नाही. ओबीसी समूहाचे तर ते नेते होतेच. छगन भुजबळ यांच्या सोबतीने ओबीसींच्या प्रश्नांवर प्रसंगी पक्षीय जोडे बाजूला सारून काम करण्याची त्यांची भूमिका राहिली होती. पण म्हणून त्यांना कधी कोणत्या एका समूहाच्या चौकटीत बांधता आले नाही. परिस्थिती कितीही संघर्षाची असो , गोपीनाथ मुंडेंना कधी जातीय, सामाजिक बंधने आडवी आली नाहीत आणि म्हणूनच त्यांचा स्वतःचा बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र, सामाजिक एकोप्याचा विषय जेव्हा जेव्हा निघाला, त्या त्यावेळी तयातील गोपीनाथ मुंडे यांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली.
ज्या ज्यावेळी सामान्यांना अडचणी आल्या, त्या त्यावेळी गोपीनाथ मुंडे धावून गेले. मग दुष्काळात छावण्यांवर जाऊन त्यांनी ठोकलेला मुक्काम असेल किंवा महापुराने होत्याचे नव्हते झाल्यानंतर त्यांनी केलेली गोदापरिक्रमा असेल , ते सर्वांचे अश्रू पुसण्यासाठी सज्ज असायचे आणि गोपीनाथ मुंडेंचा चेहरा दिसला किंवा त्यांनी स्टेजवरून केसांवरून कंगवा फिरवला की टाळ्या आणि शिट्ट्या मारणारे सर्व जातिसमूहांचे असायचे. गोपीनाथ मुंडे म्हणजे सामाजिक अभिसरणाचे एक मूर्तिमंत उदाहरण असल्याची जाणीव हेच त्यांचे जीवित कार्य राहिले.
आज मात्र गोपीनाथ मुंडे हयात नाहीत आणि ज्या जिल्ह्यात त्यांनी सामाजिक एकोप्याचा धागा विणला होता, त्याच जिल्ह्यात आज अनेक समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले  दिसत आहेत. समाजासमाजामध्ये परस्पर अविश्वासाचे जे वातावरण आज निर्माण झाले आहे , केवळ अविश्वास नाही, तर एकमेकांबद्दलचा द्वेष करण्याची विकृती वाढीस लागली आहे आणि माणसात माणूस राहिलेला नाही हे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते सारे वातावरण दिवंगत गोपीनाथ मुंडेंची उणीव प्रकर्षाने जाणवायला भाग पाडणारे आहे. कोणत्याही समाजघटकाला 'हक्काने ' सांगू शकेल असा जो चेहरा गोपीनाथ मुंडेंचा होता, तो चेहरा आता कोणात शोधायचा हाच प्रश्न आहे. आज नेते नाहीत असे नाही , पण त्या प्रत्येकाला एखाद्या चौकटीत बांधले जात आहे. अगदी ज्यांची भूमिका व्यापक राहिली , त्यांनाही कसलाही विचार न करता ट्रोल केले जाते हे सारेच गोपीनाथ मुंडेंच्या उंचीची जाणीव आणि त्यांच्या नसण्याची उणीव दाखवून देणारे आहे.

Advertisement

Advertisement