Advertisement

डॉ. योगेश  क्षीरसागर यांचा पक्षाच्या पदाचा राजीनामा

प्रजापत्र | Saturday, 15/11/2025
बातमी शेअर करा

बीड : नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरु असलेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे बीड विधानसभा असलेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कालच बीड शहरात डॉ. योगेश क्षीरसागर यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीने नगरपालिका निवडणुकीची सूत्रे 'शिवछत्र ' कडे दिली होती. या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आला आहे.  डॉ. योगेश क्षीरसागर  यांनी आपल्या फेसबुकवर हा राजीनामा प्रसिद्ध केला असून फेसबुक खात्यावर आता फक्त काकू , जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे फोटो ठेवले आहेत. असून आता डॉ योगेश क्षीरसागरची पुढील राजकीय भूमिका काय असेल याची उत्सुकता मात्र कायम आहे.

 


 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बीड जिल्ह्यात सध्या मोठ्याप्रमाणावर गटबाजी सुरु आहे. अगोदर आ. धनंजय मुंडे यांना पक्षातीलच काही लोकप्रतिनिधींनी टीकेचे लक्ष केले होते, त्यानंतर आता बीड मतदारसंघात आपल्याला निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवले जात असल्याचे सांगत पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी थेट राजीनामा दिला आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पक्षाकडून बीड विधानसभेची निवडणूक लढविली होती, त्यात त्यांना सुमारे ९३ हजाराहून अधिक मते मिळाली आणि त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीची सारी सूत्रे आपल्याकडे राहावीत अशी अपेक्षा डॉ. योगेश क्षीरसागर यांची होती. मात्र यात निर्णयप्रक्रियेतूनच आपल्याला डावलले जात असल्याचे सांगत आता डॉ. क्षीरसागर यांनी थेट राजीनामा दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने कालपासूनच डॉ. योगेश क्षीरसागर याना वगळून नगरपालिका निवडणुकीची रणनीती आणि उमेदवार निश्चिती 'शिवछत्र 'वरून पंडितांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काही काळ अगोदर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचे चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र सावध भूमिका घेत स्वतःला अलिप्त ठेवले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला, त्यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली होती. आता बीड विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी झालेला घरोबा अल्पकाळातच तुटल्याचे चित्र आहे.

 

 

Advertisement

Advertisement