Advertisement

दीड लाखांच्या बैलचोरीचा खोटा बनाव

प्रजापत्र | Friday, 14/11/2025
बातमी शेअर करा

वडवणी दि.१४ (प्रतिनिधी): पिंपरखेड येथील संपत त्रिंबक निपटे आणि त्यांचे भाऊ मदन निपटे यांनी दाखल केलेल्या बनावट बैलचोरीच्या फिर्यादीचा पर्दाफाश वडवणी पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या सखोल तपासात तक्रारदारांनी स्वतःच खोटा गुन्हा रचल्याचे उघड झाले असून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना गुरुवार (दि.१३) नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

   वडवणी पोलीस ठाण्यात निपटे बंधूंनी त्यांच्या दीड लाख किमतीच्या बैलजोडीची पंधरा दिवसांपूर्वी चोरी झाल्याची तक्रार दिली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी चोरीनंतर इतक्या उशिरा तक्रार दाखल करण्यामागील कारण तसेच या जोडीसंबंधी आर्थिक व्यवहार झाला आहे का, अशी वारंवार चौकशी केली. मात्र तक्रारदारांनी कोणतेही तथ्य सांगण्यास नकार दिला.तपासदरम्यान पोलिसांना बैलजोडी भावठाणा येथील शेतकरी श्रीकांत चंद्रकांत मगर यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना समक्ष बैलांसह हजर केले असता त्यांनी ही बैलजोडी बाबाराव डाके, रहिवासी टकारवाडी, यांच्याकडून विकत घेतल्याचे स्पष्ट केले.

यानंतर मध्यरात्री पोलिसांनी टकारवाडीत जाऊन बाबाराव डाके यांची चौकशी केली असता, त्यांनी हीच जोडी तक्रारदार संपत निपटे यांच्याकडून पैसे देऊन विकत घेतल्याचे सांगितले. या माहितीची पडताळणी केल्यानंतर निपटे बंधूंनी खोटी चोरी दाखवून पोलिसांची दिशाभूल केल्याचे सत्य तपासात समोर आले.

यावरून वडवणी पोलीस ठाण्यात पो.अं.नितीन काकडे यांच्या फिर्यादीवरून संपत निपटे व मदन निपटे यांच्याविरोधात पोलिसांना खोटी माहिती देऊन कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले.दरम्यान, पोलिसांनी बैलजोडी परत मिळवून ती शेतकरी श्रीकांत मगर यांच्याकडे सुपूर्द केली. बैल परत मिळाल्याने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वडवणी पोलिसांचे आभार मानले. नागरिकांनी वैयक्तिक फायद्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करू नयेत, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी ठाण्याच्या प्रभारी सपोनि वर्षा व्हगाडे, पोलीस अंमलदार नितीन काकडे, बिभीशन मुंजाळ, अशोक क्षीरसागर, आशुतोष नाईकवाडे आणि विलास खरात यांनी केली.

Advertisement

Advertisement