Advertisement

लाकूड वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर वनविभागाची कारवाई

प्रजापत्र | Monday, 10/11/2025
बातमी शेअर करा

शिरुर कासार दि.१०(प्रतिनिधी):  तालुक्यातील अवैध वृक्षतोडीवर अंकुश ठेवण्यासाठी वनविभागाने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. बीड–पाथर्डी रोडवरील खालापुरी येथे रविवारी (दि.९) रोजी रात्री विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा एक टेम्पो वनविभागाच्या पथकाने पकडला. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वृक्षतोड करणाऱ्या  व्यापारात  खळबळ उडाली आहे.

  अधिक माहितीनुसार, एम.एच. २३ डब्ल्यू ११४४ हा टेम्पो विनापरवाना वृक्षतोड करून लाकूड वाहतूक करत असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून खलापुरी परिसरात अडवला. संबंधित वाहन आणि लाकूड ताब्यात घेऊन व्यापाऱ्यावर  पाटोदा वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आसुन गाडी ताब्यात घेऊन जप्त केली आहे.सदरील कारवाई प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अजय देवगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनरक्षक दादासाहेब जोशी, तसेच वनमजूर अंबादास लवांडे, सोपान येवले, सतीश गर्जे, गहिनीनाथ दानवले,भिमराव सावसे यांनी सहभाग घेतला. पथकाने तात्काळ वाहन आणि अवैध लाकूड जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाने घेतलेली ही कारवाई ही एक इशारा कारवाई असल्याचे समजते.वनविभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अवैध वृक्षतोडीमध्ये काही स्थानिक व्यापारी आणि दलालांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पुढील चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.

 

तालुक्यात कोठेही वृक्षतोड होत असेल तर तात्काळ वनविभागाला फोन करून माहिती द्या. आम्ही तत्काळ कारवाई करू
असे वनरक्षक दादासाहेब जोशी यांनी सांगितले.

 

Advertisement

Advertisement