Advertisement

चित्र बहुरंगी लढतीचे, पण क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागरचीच चर्चा  

प्रजापत्र | Saturday, 08/11/2025
बातमी शेअर करा

बीड दि.७  (प्रतिनिधी): जिल्ह्याचे मुख्यालय आणि जिल्ह्यातील एकमेव 'अ ' वर्ग नगरपालिका असलेल्या बीड नगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीतील  पक्षांमध्ये देखील चुरस आहे, त्यासोबतच वंचित, एमआयएम यांनी देखील मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे बीड नगरपालिकेचे लढतीचे चित्र बहुरंगी असेल, मात्र सध्या तरी सारी चर्चा क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशीच फिरत असून आ. संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उमेद्वारांमधील लढत उत्कंठा वाढविणारी राहणार आहे.
बीड नगरपालिकेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. बीड शहरात प्रथमच अनुसूचित जातीला  नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. मागच्या काही काळात नगराध्यक्षपदाची स्वप्ने अनेकांनी पहिली होती, मात्र आरक्षणामुळे सारीच समीकरणे बदलली आहेत. बीड नगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी यावेळी राष्ट्रवादी (शप ) चे आ. संदीप क्षीरसागर यांनी जोर लावला आहे. माजी आ. सय्यद सलीम यांच्या सोबतीने त्यांनी मागच्या अनेक दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी (शप ) मध्ये त्यांचाच निर्णय अंतिम राहणार असल्याने त्यांच्याकडे उमेदवारांची देखील गर्दी होताना दिसत आहे. नगराध्यक्षपदासाठी त्यांनी काही चेहरे देखील शॉटलिस्ट केले असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यांनी आपले पत्ते अद्याप उघडलेले नाहीत.
दुसरीकडे बीड नगरपालिकेवर काही अपवाद वगळता दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर नगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उतरले आहेत. मात्र त्यांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि अंतिम निर्णय कोणाचा हे अद्याप निश्चित नसल्याने त्यांना स्वपक्षापासूनच संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्याकडे देखील जुन्या आणि नव्या चेहऱ्यांची गर्दी आहे, मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय निर्णय अद्याप झालेला नाही. या काही गोष्टी आज तरी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आव्हान आहेत.
बीड शहरात भाजपची शक्ती आजपर्यंत स्वबळावर नगराध्यक्ष होण्याची दिसून आलेली नाही,मात्र भाजपचा स्वतःचा असा एक मतदार शहरात आहे. २०१६ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला ९ हजारापेक्षा जास्त मते पडली होती, त्यामुळे भाजप देखील आपला पॅनल उतरविण्याच्या विचारात आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी नागराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे , मात्र शिवसेना किती जागा लढविणार हे अद्याप स्पष्ट नाही.
नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने यावेळी वंचित ने देखील निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून अरुण आठवले या वंचितच्या उमेदवार असणार आहेत. तर १० तारखेला वंचित सदस्य पदाच्या १० उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. बीड शहरात एकेकाळी एमआयएमचा देखील मोठा प्रभाव राहिलेला आहे. २०१६ च्या निवडणुकीत एमआयएमचे ११ नगरसेवक निवडणून आले होते. पुढे या पक्षात फूट पडली हा भाग वेगळा, मात्र आता शेख शफिक हे देखील एमआयएमच्या माध्यमातून पक्षाची शक्ती दाखवून द्यायला उत्सुक आहेत.त्यामुळे बीड पालिकेत आजतरी बहुरंगी म्हणावे असे चित्र असेल. सुरुवातीला बहुरंगी वाटणारी निवडणूक शेवटपर्यंत तशीच राहते का नंतर निवडणुकीचे आणि लढतीचे चित्र बदलते हे मात्र अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल.

 

Advertisement

Advertisement