बीड दि. ३ (प्रतिनिधी ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावलेल्या मुंबईतील बैठकीतही बीड जिल्ह्यातील गटबाजी उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः बीड मतदारसंघाच्या संदर्भाने निर्माण झालेल्या गटबाजीसमोर अजित पवार देखील हतबल असल्याचे चित्र आहे.बीड मतदारसंघात आम्ही सर्व्हे केला आहे, पक्षाने देखील करून घ्यावा , यात ज्याला प्रतिसाद असेल त्याला उमेदवारी देण्याचा विचार करावा अशी भूमिका योगेश क्षीरसागर यांनी मांडली , तर बीड मतदारसंघातील जे कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि पक्षासाठी काम करत आहेत, त्यांना प्रवाहात घ्यावे लागेल यासाठी आ. विजयसिंह पंडित आग्रही होते. दुसरीकडे आ. प्रकाश सोळंके यांनी 'ज्याने त्याने आपले मतदारसंघ संभाळावेत , एकमेकांच्या मतदारसंघात हस्तक्षेप नको ' चा सेफ गेम खेळला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणे सुरु आहे. सोमवारी बीड जिल्ह्याचा आढावा अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. अजित पवार यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , आ. धनंजय मुंडे ,आ. विजयसिंह पंडित, आ. प्रकाश सोळंके ,कल्याण आखाडे रुपाली चाकणकर ,भागवत तावरे ,संजय दौंड , जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण , युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते , बीड विधानसभाध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्ह्यात सुरु असलेली गटबाजी अजित पवार यांच्यासमोर देखील उफाळून आली. बीडमधील अमर नाईकवाडे , फारूक पटेल , मोईन मास्टर यांनी ज्या कार्यकर्त्यांचे काम आणि प्रभाव आहे, त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे यावर भर दिला तर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आम्ही सर्व्हे केला आहे, पक्षाने देखील करावा, यात जायचे कॅलिबर दिसेल त्यांचा उमेदवारीसाठी विचार व्हावंसं अशी भूमिका मांडली , त्याचवेळी गेवराईचे आ. विजयसिंह पंडित यांनी 'पक्षाच्या आदेशानेच आम्ही बीडमध्ये लक्ष दिले, येथील कार्यकर्ते आमच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी काम करत आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात घ्यावे लागेल, त्यांचा विचार करावा लागेल ' अशी भूमिका मांडली. मध्यंतरी आ. सोळंके आणि आ. पंडित यांचे परस्परपूरक राजकारण सुरु असल्याचे चित्र होते या बैठकीत मात्र आ. सोळंके यांनी 'ज्याने त्याने स्वतःचा मतदारसंघ पाहावा ' अशी भूमिका घेतली. यात माजलगाव मतदारसंघात इतरांचा हस्तक्षेप नको असेच त्यांना सुचवायचे होते.
स्थानिक संस्था पक्षाच्याच ताब्यात येतील : मुंडे
मागच्यावेळी आपली सत्ता नसताना देखील आपण जिल्हापरिषद पक्षाच्या ताब्यात आणली होती, यावेळी तर सत्ता आहे. बीड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील साऱ्याच स्थानिक संस्था पक्षाच्या ताब्यात येतील , त्यासाठी ताकतीने लढू, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी भूमिका यावेळी आ. धंनजय मुंडे यांनी मांडली
तुमच्या भूमिका , आमची गोची : चव्हाण
या बैठकीत खुद्द जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनीच जिल्ह्यातील गटबाजीवर प्रकाश टाकताना वरिष्ठांना देखील खडे बोल सुनावले. या गटबाजीला कोण जबाबदार आहे, याचे फोटो टाका, त्याचे टाकू नका , हे आसे करा हे कोण सांगते ? तुमच्या भूमिका होत राहतात, मात्र खाली कार्यकर्त्यांची गोची होते असे चव्हाण म्हणाले.
गटबाजी, बेदिली थांबवा : दौंड
माजी आ. संजय दौंड यांनी देखील पक्षातील गटबाजी आणि बेदिलीवर सडकून टीका केली. आपल्याला पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आहे, याने त्याला विरोध करायचा, त्याने याला विरोध करायचा असे चालणार नाही. अजित पवारांनीच सर्वांना सांगून पक्षातील गटबाजी आणि बेदिली थांबविली पाहिजे असे दौंड म्हणाले.

प्रजापत्र | Tuesday, 04/11/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
