Advertisement

जिल्ह्यातील राष्ट्रवादी सोमवारी अजित पवारांच्या दरबारात

प्रजापत्र | Sunday, 02/11/2025
बातमी शेअर करा

बीड दि. १(प्रतिनिधी ): जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच अंतर्गत गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादीला निवडणुकीत एकसंघ ठेवण्याचे आव्हान निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ३ ) अजित पवारांनी बीड जजिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
बीड जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील निवडणुकीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मात्र अजित पवारांच्या पक्षात सध्या अंतर्गत गटबाजी मोठ्याप्रमाणावर वाढली असून निवडणुकीच्या अगोदरच त्याचे जाहीर प्रदर्शन देखील झालेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता स्वतः अजित पवार बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची बैठक सोमवारी (दि. ३ ) घेणार आहेत. या बैठकीसाठी पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी , पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आल्याची माहिती आहे .

जिल्ह्याचा नेता कोण ?
पक्ष संघटनेत एकमुखी निर्णय होणे महत्वाचे असते , मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या काही वर्षात जिल्ह्याचा नेता ही संकल्पना जवळपास बाद करण्यात आली होती. मात्र मध्यंतरी बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व आले होते.मात्र मधल्या काळात जिल्ह्यातीलच नेत्यांनी त्यालाही आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. सध्या आ. सोळंके , आ. पंडित यांचा एक गट तर धनंजय मुंडे यांचा एक गट जिल्ह्यात पाहायला मिळतो , त्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीसाठी एकमुखी नेतृत्वावर निर्णय होणार का ? हा देखील मुद्दा आहे.

पंडित -क्षीरसागर वाद
बीड नगरपालिकेच्या संदर्भाने सध्या जिल्ह्यात माजी आ. अमरसिंह पंडित गट आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यातील राजकीय वाद चर्चेत आले आहेत. बीड शहरातील राष्ट्रवादीच्याच एक गट अमरसिंह पंडित यांच्या संपर्कात असल्याने डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पंडितांवर नाव न घेता टीका केली होती, त्यामुळे आता पंडित- क्षीरसागर वादावर देखील बैठकीत चर्चा होते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Advertisement

Advertisement