बीड दि. १ (प्रतिनिधी)-:निवडणुकीच्या काळात नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि आघाड्यांना कमालीचे महत्व येत असते.बहुतांश राजकीय नेते आपले पक्षासोबत जमेलच याची शक्यता नसल्याने वगवेगळ्या आघाड्या देखील नोंदवून ठेवत असतात.बीड जिल्ह्यात आतापर्यंत अशा दोन डझन (२४) पक्ष अथवा आघाड्यांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे झाली आहे.विशेष म्हणजे यातील बहुतेक नोंदणी त्या त्यावेळी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाली असून बहुतेक पुढाऱ्यांनी वेगवेगळे पक्ष नोंदविलेले आहेत.

राजकारणाची आवड बीड जिल्ह्याच्या मातीतच आहे.येथे प्रत्येकालाच राजकारणात यावे असे सातत्याने वाट असते,त्यामुळेच येथील नेते आणि कार्यकर्ते देखील राजकारणाच्या बाबतीत कमालीचे सावध असल्याचे पाहायला मिळते.त्यातूनच बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्ष किंवा आघाड्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यात निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेल्या पक्ष किंवा आघाड्यांची संख्या ४१६ इतकी आहे, त्यातील दोन डझन म्हणजे तब्बल २४ राजकीय पक्ष बीड जिल्ह्यातील आहेत.विशेष म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक पुढाऱ्यांनी 'संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग ' म्हणून आपल्या आघाड्यांची किंवा पक्षाची नोंदणी करून ठेवलेली आहे.
आष्टी मतदारसंघ आहे अपवाद
एकीकडे जिल्हाभरात राजकीय पक्ष अथवा आघाड्यांच्या नोंदणीवर भर असला तरी आष्टी मतदारसंघ मात्र या बाबतीत जिल्ह्यात अपवाद असल्याचे चित्र आहे.आष्टी मतदार संघात कोठेच कोणताच राजकीय पक्ष नोंदविण्यात आल्याचे चित्र नाही.
नोंदणीकृत राजकीय पक्षाचा फायदा काय ?
राज्य निवडणूक आयोगाकडे एखादा पक्ष नोंदणीकृत असेल तर त्या पक्षाचे उमेदवार मतपत्रिकेवर प्रादेशिक पक्षांच्या खालोखाल येतात, त्यानंतर अपक्षांचा क्रमांक लागत असतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जेथे साखळी पद्धतीने निवडणूक होते, नोंदणीकृत राजकीय पक्ष अशा निवडणुकीत आपल्या सर्व उमेदवारांसाठी एकाच चिन्हाची मागणी करू शकतात आणि त्यांना ते एकच चिन्ह मिळते.
पक्षांतरबंदी कायदा लागू
नोंदणीकृत राजकीय पक्षाकडून किंवा आघाडीकडून निवडून आलेल्या सर्व संबंधितांना पक्षांतरबंदी कायदा लागू असतो
असे आहेत बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत राजकीय पक्ष
गेवराई विकास आघाडी,स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडी,राष्ट्रीय क्रांती सेना, जय जवान जय किसान शेतकरी संघटना , जय क्रांती सेना, काकू नाना विकास आघाडी, बदामराव पंडित मित्र मंडळ आघाडी, भारतवादी एकता पार्टी , अंबाजोगाई शहर परिवर्तन विकास आघाडी,जनविकास आघाडी,, भारतीय युवा सेना, टिपू सुलतान सेना, राष्ट्रीय विकास आघाडी, जनविकास परिवर्तन आघाडी, राष्ट्रीय भगवान सेना ,बीड जनता विकास आघाडी, मराठा संग्राम पक्ष, लोक विकास महाआघाडी , राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी, मराठवाडा शेतकरी विकास परिषद ,लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडी, ऑल इंडिया मजलिस ए इन्किलाब ए मिल्लत ,यशवंत सेना , शिवस्वराज्य पक्ष

