बीड दि.१ (प्रतिनिधी)-जिल्ह्यात वर्ष ते दीड वर्षांपासून वाळू बंद असल्याने सर्वसामान्यांची बांधकामे अर्धवट स्थितीत असताना दुसरीकडे सरकारी कार्यालय आणि पोलिसांच्या बांधकामासाठी मात्र सर्रासपणे वाळूचे ढीग लागत असल्याचा प्रकार 'दैनिक प्रजापत्र'ने पुढे आणला होता.पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कर्तव्यकठोर भूमिकेचा पडदा याप्रकारामुळे टराटरा फाटल्यानंतर अखेर रात्रीतूनच हे वाळूचे ढिगारे हलवून त्या ठिकाणी भुकट्याचा वापर सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.पोलीस अधिक्षकांनी स्वतः लक्ष घातल्यानंतर यात मोठा बदल झाल्याचे सांगितले जाते.
बीड जिल्ह्यात वाळू घाटाची परिस्थिती सर्वश्रुत आहेत.टेंडर नसल्याने वाळू उपशावर निर्बंध आहेत.त्यात बीड जिल्ह्याच्या वाळू माफियांचा विषय थेट मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनातच गाजला होता.लोकप्रतिनिधींनी ही वाळूमाफियांचा हैदोस गृहमंत्र्यांच्या समोर मांडल्यामुळे वाळूच्या तस्करीवर आळा घालण्याचा सक्त सूचना देण्यात आल्या.पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी जिल्ह्यात येताच अवैध धंद्यांसोबतच वाळूच्या तस्करीवर बारकाईने लक्ष केंद्रित करत प्रभारी अधिकाऱ्यांना वाळूचा कण ही हलला तर कठोर निर्णय घेतला जाईल असा इशाराच दिला.दरम्यान गोदापात्रात काही कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिक्षकांच्या भूमिकेला ठेंगा दाखविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली देखील करण्यात आली होती.तर दुसरीकडे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी अनेक वाहनांवर बोजा चढविल्यामुळे माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.एकंदरीत या सर्व परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यात वाळूला सोन्याचा भाव आला.सामान्यांना वर्ष सव्वावर्षापासून वाळूअभावी बांधकामे बंद ठेवावी लागत आहेत.दरम्यान हे चित्र गोरगरिबांच्या बाबतीत असताना मात्र प्रशासनाचे बांधकामे सर्रासपणे सुरु आहेत.शासकीय कामांसाठी ठेकेदार वाळूची तस्करी देखील करत असताना प्रशासनाला आपल्याच बुडाखालचा अंधार दिसत नाही हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे.दैनिक 'प्रजापत्र' ने पोलिसांच्या संरक्षण भितींच्या बांधकामासाठी वाळूचे ढिगारे लावल्याचा प्रकार समोर आणल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी स्वतः यात लक्ष घालून हे ढिगारे हलविण्यासाठी कदाचित आदेश दिले असावेत,त्यामुळेच रात्रीतून आता वाळूऐवजी भिंतीसाठी भुकट्याचा वापर सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.दरम्यान कालची वाळू मात्र कोठून आली याचे उत्तर कोणाकडेच नव्हते.

बातमी शेअर करा
