धाराशिव ता. 29 : धाराशिव शहरातील 140 कोटी च्या रस्ते कामाना कार्यारंभ आदेश आल्यानंतर फडणवीस सरकारने त्यास स्थगिती दिली असून याचा दोष मात्र आमच्यावर? म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार आता जिल्ह्यात सुरु झाला आहे. निधी जाहीर झाला की त्याच श्रेय यांनीच घ्यायचं पण मनासारखं नाही झालं की आमच्यावर ढकलायचं असा रडका प्रकार राणा पाटील यांनी करत आहेत असा टोला शिवसेना ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
यावेळी जाधवर म्हणाले की, विरोधात असलेल्या आमदार, खासदार यांना या राज्यात सत्ताधारी कशी वागणूक देतात हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. शहरात 140 कोटींचा निधी मंजूर झाला तेव्हा तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत व भाजप आमदार राणा पाटील यांच्यातच श्रेयवाद होता. फेब्रुवारी 2024 पासून कामाची निविदा काढण्यासाठी साधारण 20 महिने लागले. हे राबविताना अनियमितता झाल्याचे त्यांच्याच मित्रपक्षाकडून बोलल जात आहे. जिल्ह्यात हक्काच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाना स्थगिती आणली म्हणून ढोल वाजविणारे भाजप आमदार राणा पाटील आता एका कामास त्यांच्याच मित्र पक्षाकडून रस्ते कामास स्थगिती आणल्यावर मात्र विरोधकांना दोष देत आहेत. हे निव्वळ हास्यास्पद आहे. अहो, 'दुकान तुमचं दुकानदारी तुमची आणि तोटा झाला आमच्यामुळं' हे कोणाला तरी पटेल का? जुलै 2022 ला महाविकास आघाडीचे सरकार पडून महायुतीचे सरकार आले. तेव्हा याच सत्ताधारी मंडळींनी मागील आघाडी सरकारने मंजूर केलेल्या सर्व कामाना स्थगिती दिली होती. न्यायालयीन निर्णय होऊनही ही स्थगिती उठवली नाही. मग सरकार मध्ये आमच्या मताला एवढं महत्व असते तर ही कामे रद्द झाली असती का? यात शहरातील रस्ते, तीन बगीचा, आठवडी बाजार या कामाचा समावेश होता. नव्या सरकारने तीच कामे पुन्हा मंजूर केली पण त्यातील एकही काम अजून हाती घेण्यात आलं नाही. उघडपणे स्थगिती देणारे तुम्ही असतानाही आम्ही परिस्थितीला सामोरे गेलो. न्यायालयीन लढा दिला याउलट आता यांचेच मुख्यमंत्री सांगेल तेव्हा कोणत्याही कामाला अजूनही स्थगिती देतात उदाहरण डीपीसी निधी. मग रस्त्याच्या कामाना तुमच्याच सरकारने स्थगिती दिल्यावर हे जर विरोधकावर बोट दाखवणार असतील तर यापेक्षा मोठा विनोद कोणता? असा सवाल तानाजी जाधवर यांनी सत्ताधारी आमदाराना केला आहे. दुसऱ्याना अपप्रवृत्ती म्हणनाऱ्याची स्व : प्रवृत्ती काय आहे? एक गुत्तेदार अपात्र असतानाही त्याला पुन्हा पात्र करून घेण्यासाठी वीस महिने तुम्ही केलेली धडपड तुमची प्रवृत्ती दाखवून देते. पण काळ हेच त्याच उत्तर असते. माझ्याच मनासारखं झालं तर ठीक नाहीतर काहीच होऊ द्यायचे नाही या तुमच्या मनोवृत्तीमुळे जिल्ह्याचे नुकसान होत आहे. आपले दोष बाजूला ठेवून दुसऱ्याना दोषी ठरविने हा निव्वळ बालिशपणा असल्याच मत प्रवक्ते तानाजी जाधवर यानी व्यक्त केले आहे.
रस्त्याची कामे लवकर व्हावी हीच प्रामाणिक भावना आम्ही एसआयटीची मागणी केलीच आहे. त्यात दोष कोणाचा हे समोर येईल पण तुमच्या अर्थकारणामुळे शहरवासीयांचे वीस महिन्यापासून जे हाल होत आहेत हे थांबावेत. ही रस्त्याची कामे लवकर सुरु व्हावेत हीच आमची प्रामाणिक भावना असल्याच जाधवर यांनी सांगितले.

प्रजापत्र | Wednesday, 29/10/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
