Advertisement

दुचाकीवर आलेल्या दोघांनी वृद्धेचे दागिने लुटले

प्रजापत्र | Saturday, 25/10/2025
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२५(प्रतिनिधी) : दीपावली पाडव्याच्या दिवशी गणपतीचे दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७ तोळ्यांचे दागिने दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन हिसकावून लंपास केल्याची घटना येथील जोशी हॉस्पिटलजवळ बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

यशवंत चौक ते बायपास रोड या दरम्यान असलेल्या डॉ. दीपक जोशी हॉस्पिटल यांच्यासमोर व्यावसायिक प्रकाश व नंदलाल मेहता यांचे घर आहे. या रस्त्यावर नगर परिषदेच्या खांबावरील पथदिवे बंद असल्याने बऱ्याच ठिकाणी अंधार असतो. बुधवारी दीपावली पाडवा असल्याने कुटुंबातील महिला रात्री साडेआठच्या सुमारास गणपती मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. तेथून त्या परत येताना शतायुषी हॉस्पिटलकडून एका दुचाकीवर रुमालाने तोंड बांधलेले दोन तरुण विरुद्ध दिशेने आले. या महिलांना पाहून पुढे जाऊन पुन्हा दुचाकी वळवून परत फिरले. त्यांनी या महिलांच्या घोळक्यामध्ये दुचाकी घातली. त्यामुळे या महिला सैरभैर होताच फायदा घेत चोरट्यांनी दुचाकी ७७ वर्षीय वृद्ध महिला ललिताबाई गौतम मेहता यांच्या अंगावर घातली. त्यामुळे त्या रस्त्यावर खाली पडल्या. त्यावेळी झटापट करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील बोरमाळ व मंगळसूत्र असे सात तोळ्यांचे दागिने हिसकावून लंपास केले. 

Advertisement

Advertisement