Advertisement

बीड शहर पोलिसांच्या 'शीतल'तेला एलसीबीचाही धक्का

प्रजापत्र | Friday, 17/10/2025
बातमी शेअर करा

बीड दि. १६ (प्रतिनिधी )  : बीड शहर पोलिसांच्या 'शीतल'तेमुळे या पोलीस ठाण्याची हद्द अवैध धंदे करणारांना नंदनवन वाटत असतानाच पोलीस उपाधिक्षकांपाठोपाठ आता एलसीबीने शहर हद्दीत कारवाई केली आहे. बीड शहर हद्दीतून एका मोठ्या कारवाईत २ लाख ४१ हजारांचा गुटखा जप्त करत गुटखा धंद्यातील एका मोठ्या आसामीवर एलसीबीने कारवाई केली आहे. गुटखा माफियांसोबतच शहर पोलिसांच्या शीतलतेला देखील हा मोठा धक्का मानला जात आहे.वरिष्ठांना सारे आलबेल असल्याचे 'कीर्तन' ऐकवणाऱ्या शहर पोलिसांच्या हद्दीत नेमके काय चालते हे आता समोर आल्याने पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा असतील.
जिल्हाभरात पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे आणि अवैध गोष्टी खपवून न घेण्याचा इशारा दिला असला तरी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नाकाखाली असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याची हद्द मात्र अवैध धंद्यांसाठी नंदनवन ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीस उपाधिक्षकांनी शहर पोलिसांच्या हद्दीतील जुगाराच्या जत्रेवर कारवाई केली होती. त्यानंतर २४ तासातच एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हा शाखेने पुन्हा एकदा शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या हद्दीत चालणाऱ्या गुटखा व्यवसायावर कारवाई केली आहे. झमझम कॉलनी भागातील  एका पत्र्याच्या शेडममधून एलसीबीने २ लाख ४१ हजारांचा गोवा गुटखा जप्त केला आहे.या प्रकरणात पोलिसांनी अजमतुल्ला सय्यद रजाउल्ला आणि रेहमतुल्ला सय्यद रजाउल्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड , अंकुश वरपे,आलिम आदींनी केली.

अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ?
एकीकडे बीड शहर पोलीस जिल्हाभर साळसूदपणाचा आव आणतात, अनेक प्रकरणात शहर हद्दीतील अधिकारी इतरांना 'मार्गदर्शन' देखील करतात असे सांगितले जाते.मात्र त्यांच्याच हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेला हरताळ फासून अवैध धंदे सुरु असल्याचे रोजच समोर येत आहे. हे अवैध धंदे  कोणाच्या 'नियंत्रणा खाली सुरु असतात याचा शोध आता पोलीस अधीक्षकांनीच घ्यावा आणि लहान कर्मचाऱ्यांना जशी शिक्षा दिली जाते तोच कित्ता आता अवैध धंद्यांकडे शीतलता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल देखील गिरवावा असे अपेक्षित आहे.

एलसीबीचे धाडसच
बीड जिल्ह्यात गुटख्याची पाळे'मुळे' खोलवर रुजलेली आहेत.या व्यवसायातील दोन तीन बड्या आसामींना हात लावण्याची हिंम्मत सहसा यंत्रणेतील लोक करत नाहीत. त्यातच शहर पोलिसांच्या 'शीतल'तेमुळे काही लोक गुटख्याच्या धंद्यातील 'शहेनशहा' असल्यासारखे वागत आहेत.आता मात्र एलसीबीने थेट अजमतुल्ला सय्यद रजाउल्ला यांच्यावरच कारवाई करून मोठे धाडस दाखविले आहे.आता या गुटखा माफियांची सारी साखळी पोलिसांनी शोधावी असे अपेक्षित आहे.

Advertisement

Advertisement