Advertisement

संपादकीय अग्रलेख - अस्मितेच्या पलीकडे जाणार का नाही ?

प्रजापत्र | Friday, 12/09/2025
बातमी शेअर करा

नगर (सध्याचे अहिल्यानगर )-बीड -परळी रेल्वेमार्गाच्या अहिल्यानगर ते बीड टप्प्यातील रेल्वेला मराठवाडा मुक्ती दिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखविणार आहेत. हा रेल्वेमार्ग बीड जिल्हावासियांचे स्वप्न म्हणूनच दाखविला गेला, रंगविला गेला, त्याला अस्मितेशी जोडले गेले. ते स्वप्न आता अर्धेमुर्धे का होईना पूर्ण होणार आहे . मात्र खरोखर या अर्ध्यामुर्ध्या स्वप्नाला व्यावहारिक अर्थ असा कितीसा उरला आहे याचा विचार गांभीर्याने होणार आहे का ? अस्मितेच्या पलीकडे जाऊन वास्तवदर्शी विचार करण्याची मानसिकता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची आहे का ?
 
     दळणवळण हे कोणत्याही भागाच्या विकासासाठी महत्वाचे साधन असते. दळणवळणाची साधने नसतील तर विकास खुंटतो. त्यामुळेच अगदी पूर्वीपासून रस्ते, रेल्वे, विमानसेवा , मजिथे शक्य असेल तिथे सागरी मार्ग हे त्या त्या भागाच्या अस्मिता म्हणून ओळखले जातात. कोकण रेल्वे ही जशी कोकणवासीयांची  अस्मिता होती, अगदी त्याच धर्तीवर ९० च्या दशकापासून नगर-बीड-परळी रेर्ल्वेमार्गाला बीड जिल्ह्याची अस्मिता म्हणून पाहिले गेले. या रेल्वेमार्गाच्या मुद्द्यावर अनेक निवडणुका झाल्या. अनेकांच्या खासदारकीचा मार्ग या रेल्वेमार्गाने सुकर केला.९० च्या दशकात ज्यावेळी या रेल्वेमार्गाची कल्पना समोर आली, त्यावेळी प्रवासाच्या सोयी तुलनेने कमी होत्या, रस्ते आजच्यासारखे नव्हते. त्यामुळे त्या काळात ही रेल्वे आली म्हणजे लगेच मुंबई जवळ होईल असा भाबडा का होईना आशावाद होता आणि म्हणूनच या रेल्वे मार्गासाठी मोठा संघर्ष करावा लागला. बीड जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यापासून लोकप्रतिनिधींपर्यंत, व्यापाऱ्यांपासून स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत अनेक समाजघटकांनी या लढ्यात सहभाग नोंदविला . आता कुठे या रेल्वे मार्गाचा अर्धा टप्पा पूर्ण होत आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे धावणार आहे आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखविणार आहेत. अर्थात अजून या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम व्हायचे आहे, त्यामुळे काही दिवस तरी या मार्गावरून डिझेल रेल्वे धावणार आहे. अर्धेमुर्धे का होईना स्वप्न पूर्ण होणार असल्याने साहजिकच बीडकरांना आनंद वाटतोय आणि सरकारने अर्धे का होईना काम केले म्हणून सरकारचे स्वागतच.
पण आजचे स्वप्न उद्या तितकेच भव्य किंवा मनोहारी राहीलच असे नसते. आज वास्तवात जाऊन विचार केल्यास या रेल्वे मार्गाबद्दल देखील तसेच म्हणण्याची वेळ आलेली आहे. सुरुवातीला नगर ते अंमळनेर या मार्गावर काही काळ ही रेल्वे धावली, मात्र या प्रवासाला लागणार वेळ पाहता ये रेल्वेला मिळालेला प्रतिसाद अगदीच उत्साहशून्य म्हणावा असा आहे. आता बीड ते अहिल्यानगर प्रवासाला सुमारे साडेचार तास लागणार आहेत आणि ही रेल्वे सेवा दिवसातून एकदाच, त्यातही रविवार वगळून असणार आहे. असे बीडहून अहिल्यानगरला जायचे म्हटल्यास दोन ते तीन तास पुरतात , त्यामुळे प्रवास खर्चात होणारी बचत हा एक विषय सोडला तर या मार्गावरून रेल्वे प्रवासासाठी उत्साह वाटावा असे कोणतेही कारण सध्या तरी दिसत नाही हे वास्तव आहे. रेल्वेच्या प्रवासाला कोठेही अधिकच वेळ लागतोच हे मान्य केले तरी जोपर्यंत अहिल्यानगरवरून थेट मुंबईला जोडणी मिळणार नाही , तो पर्यंत बीड- अहिल्यानगर रेल्वेमार्ग म्हणजे बीडकरांसाठी केवळ भावनिक समाधान यापलीकडे फार काही होईल असे वाटत नाही.
झाले ते किंवा होत आहे त्याचे स्वागतच, पण आता बदलत्या काळानुसार स्वप्ने देखील बदलत आहेत, गरज बदलत आहेत, त्याचे काय ? अहिल्यानगर -बीड रेल्वे मार्गामुळे बीड हे नाव रेल्वेच्या नकाशावर आले हे खरे असले तरी त्याचा अधिकाधिक उपयोग करायचा असेल ते केवळ ही एकटी रेल्वेलाईन पुरेशी नाही हे देखील तितकेच खरे. एकतर अहिल्यानगरहून थेट मुंबई जोडली जाणे आवश्यक आहे, त्यासोबतच आता धाराशिव-जळगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गाला गती मिल्ने आवश्यक आहे. ते झाले तरच खऱ्याअर्थाने बीड जिल्ह्याची रेल्वे व्यापक होईल. तो रेल्वे मार्ग झाला तर या मार्गांवरची वाहतूक वाढेल आणि खऱ्याअर्थाने बीड देशाशी जोडले जाईल . त्यामुळे या भावनिक मुद्द्याच्या पलीकडे जाऊन व्यावहारिक विषय म्हणून धाराशिव-जळगाव रेल्वेमार्गासाठी जोर लावणे आवश्यक आहे. अन्यथा केवळ अहिल्यानगर-बीड हा मार्ग उद्या भविष्यात परळीपर्यंत जोडला जरी गेला तरी त्या मार्गावरून प्रवाशी वाहतूक किती होईल हे सांगणे अवघड आहे. आणि आज सुरु झालेली रेल्वे पर्वाशीच नसतील तर दीर्घकाळ चालेल का हा देखील आजच भेडसावणारा प्रश्न आहे. हा मार्ग केवळ मालवाहतुकीच्या मार्ग होऊ नये यासाठी बीडला आणखी काही रेल्वेमार्गांशी जोडणे आवश्यक असून आता त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे

Advertisement

Advertisement