केज दि.८(प्रतिनिधी): प्रवासी बनून गाडीत बसलेल्या दोन इसमांनी चालकावर चाकू हल्ला करून सोन्याची साखळी व रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील बरड फाटा येथे शनिवार (दि.६) रोजी घडली आहे.
ऋषीकेश उत्तेकर हे सचिन गायकवाड यांच्या मालकीच्या कारवर (MH12SF6786) चालक म्हणून कार्यरत आहेत. संबंधित वाहन उबर अँपवर नोंदणीकृत असून महाराष्ट्रभर प्रवासी भाड्याने नेण्याचे काम केले जाते. शुक्रवार दि.५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उबर अँपमध्ये पुणे ते अंबाजोगाई असे भाडे दाखल झाले होते. त्यानुसार ऋषीकेश उत्तेकर हे पुण्यातील चाकण चौक येथे पिकअपसाठी गेले असता ग्राहकाने ट्रिप रद्द केली. मात्र त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या दोन तरुणांनी थेट भाडे ठरवून अंबाजोगाईला जाण्याचे ठरविले. संध्याकाळी ते उत्तेकर यांच्याकडील कार मधून निघाले. शनिवार (दि.६) रोजी पहाटेच्या ४ च्या सुमारास बरड फाटा येथील पेट्रोलपंपाजवळ पोहोचताच मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनी अचानक उत्तेकर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचली.यावेळी उत्तेकर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींपैकी एकाने धारदार चाकूने त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यावर व मानेवर वार केले. त्यानंतर गाडीत ठेवलेली रोख रक्कम पाच हजार रुपये व अडीच तोळे वजनाची सोन्याची साखळी हिसकावून घेत आरोपी कारमधून उतरून अंधारात पसार झाले.जखमी अवस्थेत उत्तेकर यांनी गाडी घेऊन पेट्रोलपंपावर पोहोचून मदत मागितली. त्यानंतर त्यांना अँम्ब्युलन्सने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.