बीड दि.२९(प्रतिनिधी): जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Beed Collector Office) गेल्या पंधरा दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असलेल्या एका उपोषणकर्त्यानं शुक्रवार (दि.२९)रोजी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
रामहरी महादेव वायबसे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या उपोषणकत्याचं नाव आहे. रामहरी वायबसे व त्यांचे कुटुंबीयांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या १५ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. रामहरी यांनी शुक्रवारी (दि.२९) रोजी सकाळी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात(Beed Collector Office) जाऊन अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात पोलिस कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मला न्याय द्या, म्हणत अंगावर ओतलं डिझेल...
मिळालेल्या माहितीनुसार, रामहरी महादेव वायबसे गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या कुटुंबीयांसह बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहे. सख्खा भाऊ असणाऱ्या संभाजी वायबसेवर कारवाई करा, ही मागणी रामहरी वायबसे यांनी केली आहे. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने रामहरी हताश झाले. शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला आणि दरबार कक्षात पोहोचले. तिथे त्यांनी मला न्याय द्या असं म्हणत अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी आता रामहरी वायबसे यांना ताब्यात घेतलं आहे.