Advertisement

संपादकीय अग्रलेख- विश्वासाचा बळकट धागा

प्रजापत्र | Friday, 29/08/2025
बातमी शेअर करा

राजकारण, समाजकारणात समाजाचा विश्वास मिळविणे आणि दीर्घकाळ तो टिकवून ठेवणे मोठे आव्हान आहे. हाती कोणतीही संस्था, कोणतेही संवैधानिक पद नसताना असा विश्वास टिकवून ठेवणे आणि समाज जोडून ठेवणे हे तर आणखीच कठीण आव्हान, त्यातही बहुसंख्य असलेल्या समाजाच्या बाबतीत अशी काही गोष्ट म्हणजे अशक्य वाटावी अशीच, मात्र मनोज जरांगे यांनी ती गोष्ट साध्य केली आहे. आज मुंबईमध्ये जो मोठ्याप्रमाणावर मराठा समाज दाखल झाला आहे, तो मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यातला विश्वासाचा धागा किती बळकट आहे हेच दाखविणारा आहे.
      
मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे यांनी सुरु केलेले आंदोलन, त्यांच्या मागण्या, त्यांची मागण्या मागण्याची पद्धत, त्यांची भाषा आणि आंदोलनादरम्यान घडलेल्या काही घटना याबद्दल मतभेद असू शकतात, आहेत, मात्र कोणतेही संघटित म्हणावे असे काही समीकरण नसताना, एकाच व्यक्ति भोवती दीर्घकाळ बहुसंख्यांक असणारा समाज जोडलेला राहतो हे आश्चर्य मात्र मनोज जरांगे यांनी संपूर्ण देशाला दाखविले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. खरेतर या पूर्वी असाच मोठ्याप्रमाणावर समाज मुंबईला आला होता, मात्र वाशीमधून हा समाज परत गेला, त्यावेळी कोठेतरी समाजाची फसगत झाल्याचे चित्र होते, त्यामुळे पुन्हा हा समाज मनोज जरांगे यांच्या मागे उभा राहील का असा प्रश्न अनेकांना होता. नंतरच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे उमेदवार उभे करतील असे अनेकांना वाटत होते, तेथेही मनोज जरांगे यांनी अनेकांना वाटणारी भूमिका घेतली नाही, त्याहीवेळी आता उमेदवारीसाठी मनोज जरांगे यांच्यासोबत असणारी गर्दी आणि पर्यायाने जमाव त्यांच्यापासून दूर जाईल असेच भाकीत अनेकांचे होते. मात्र मनोज जरांगे यांनी या दोन्ही वेळच्या भाकितांना  साफ खोटे ठरविले आहे.
मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे यांनी 'चलो मुंबई'चा नारा दिल्यानंतर आता पाहिल्याइतकी गर्दी होणार नाही असाच अंदाज साऱ्या राजकीय विश्लेषकांचा होता, मात्र राजकीय खेळी वेगळ्या असतात आणि समाज मानस वेगळेच असतो हेच आता जरांगे यांच्या आंदोलनाने दाखवून दिले आहे. एखाद्या बहुसंख्यांक असणाऱ्या समाजात एखादे नेतृत्व समाजातील सामान्यांचा इतका विश्वास कमावते ही गोष्ट आजच्या काळात दुर्मिळ झाली आहे. आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनात असलेल्या सर्वांनाच मनोज जरांगे यांचे मोठेपण किंवा नेतृत्व मान्य आहे असेही नाही, मात्र तसे असले तरी या आंदोलनात आपण दिसले पाहिजे  हा सामाजिक दबाव त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आहे. म्हणूनच वेगवेगळे लोकप्रतिनिधी, गाव पुढारी या आंदोलनात आक्रमकपणे सहभागी होताना दिसतात हे देखील वास्तव आहे. खरेतर आतापर्यंत राजकारण्यांनी  म्हणायचे आणि समाजाने त्याचे अनुकरण करायचे असेच चित्र देशभर राहिलेले आहे. मनोज जरांगे यांनी त्या संकेताला अपवाद निर्माण केला आहे. जरांगे यांच्याबाबतीत समाजातील शेवटच्या घटकातील लोक काहीतरी ठरवितात आणि समाजाचे नेते म्हणविणारांना त्या निर्णयामागे यावेच लागते हे वेगळेपण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे आहे.
मनोज जरांगे यांनी समाजातील हा 'नाहीरे' वर्गात मोडणारा शेवटचा घटकच जणू संमोहित केला आहे, प्रभावित केला आहे. त्यांच्यासाठी आज मनोज जरांगे यांचा शब्द म्हणजे अंतिम सत्य ठरत आहे, आणि हाच विश्वासाचा धागा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे बळ आहे. उद्या सरकार या आंदोलनाची दखल घेईल का नाही माहित नाही, जरांगे यांच्या आंदोलनाचे, मागण्यांचे पुढे काय होईल, हे आंदोलन कोणत्या वळणावर जाईल हे आज सांगता येणार नाही, मात्र समाजासोबतचा मनोज जरांगे यांचा असलेला विश्वासाचा धागा  अधिकच बळकट झाला आहे हे नक्की.

Advertisement

Advertisement