अंबाजोगाई दि.१२ (प्रतिनिधी): गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या शॉपिंग मॉलला सोमवार (दि.११) रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याने तब्बल ३० लाखांपेक्षा अधिक रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
अंबाजोगाई (Ambajogai) येथील फय्याज मोमीन यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी मंडीबाजार याठिकाणी प्रगती शॉपींग मॉल उघडले होते. या दुकानामध्ये घर संसार उपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या असायच्या. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी १ लाख १० हजार रुपयात ३० वस्तू याठिकाणी मिळायच्या. त्यामुळे विवाह समारंभासह अन्य खरेदीदार याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करायचे. त्या अनुषंगाने दुकानात सातत्याने मोठ्या प्रमाणावर कुलर, कपाट, फर्निचर यासह वेगवेगळ्या वस्तू असायच्या. काल संध्याकाळी दुकान मालक हे दुकान बंद करून गेले मात्र रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. सदरची आग ही(Fire) शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज काढला जात आहे. दुकानामध्ये लाकडी व प्लॅस्टीकच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने काही वेळात रौद्ररुप धारण केले आणि प्रगती शॉपींग मॉलला आपल्या विळख्यात घेतले. या आगीत ३० लाखांपेक्षा अधिक रुपयांचा माल जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते. आग विझवण्याचा प्रयत्न झाला परंतु आगीच्या रौद्ररुपासमोर आग विझवणारे हतबल झाल्याचे दिसून आले.