बीड दि. ५ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या बीडमध्ये ऊसतोड कामगारांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला किमान २००० ऊसतोड कामगारांना आणण्याचे चोख 'नियोजन ' जिल्हापरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या चार तालुक्यातील ४० गावांमधून ऊसतोड कामगार आणण्यासाठी ६ विस्तार अधिकारी आणि सुमारे ८० कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्रच संबंधितांना देण्यात आले आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात ऊसतोड कामगारांकडे मोठी राजकीय व्होटबँक म्हणून देखील पाहिले जाते. या ऊसतोड कामगारांचा मेळावा जिल्ह्यात अजित पवारांच्या उपस्थितीत कदाचित प्रथमच होत असावा. उद्या (दि. ७ ) हा मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषदेतून दिली होती. आता या मेळाव्यासाठी जिल्हापरिषद प्रशासन कामाला लागले असून मेळाव्याला कामगारांना आण्याचे चोख नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक पत्र काढले असून त्यात ४ तालुक्यातील ४० गावांमधून कामगार आणण्याचे नियोजन सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावासाठी एक समन्वयक , आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर किमान ५० कामगार बसद्वारे येतील हे पाहण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आशा स्वयंसेविकांना देखील यात मदत करावी लागणार आहे. या कामगारांना आणणे, कार्यक्रम झाल्यानंतर भोजनाचे पॅकेट त्यांना बसमध्येच देणे आणि परत नेऊन सोडणे असे सारे नियोजन या कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे आणि या साऱ्यावर ४० विस्तार अधिकारी लक्ष ठेवून असणार आहेत.
अजित पवारांच्या ऊसतोड कामगार मेळाव्यासाठी अशा प्रकारे प्रशासनाला हाताशी धरून कामगार आणण्याचा कदाचित राज्यातला हा पहिलाच प्रयोग असावा .
या गावांमधून आणणार ऊसतोड कामगार
बीड : कारेगव्हाण, पिंपळनेर , करचूंडी ,लिंबागणेश , बोरफडी , पोखरी तांडा ,पिंपळवाडी ,नागझरी,नाळवंडी तांडा ,चौसाळा ,नेकनूर,ढेकणमोहा तांडा ,खडक वस्ती ,मांजरसुम्भा,उमरद ,वांगी
गेवराई : वसंतनगर तांडा ,धोंडराई ,उमापूर ,पाचेगाव, सिरसमार्ग , सिरसदेवी , राजपिंप्री , निपाणी जवळका, अर्धमसला ,खळेगाव
पाटोदा : कारेगाव ,कोतन, सौताडा ,अंमळनेर ,पारनेर ,पिट्ठी ,नायगाव, डोमरी
वडवणी : दुकडेगाव ,मोरवड ,उपळी ,कोठारबन ,चिंचवण ,वडवणी