राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यात हरीत महाराष्ट्र अभियानाच्या 'हरीत बीड' संकल्पनेतून एकाच दिवशी तीस लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. बीड सारख्या ज्या जिल्ह्यात अवघे २.३५ % इतकेच वनक्षेत्र आहे, त्या जिल्ह्यात सामूहिक स्वरूपात वृक्षारोपण मोहीम अगदी कायमस्वरूपी, अभियान म्हणून राबविण्याची आवश्यकता आहेच, याबद्दल दुमत नाहीच. त्यासाठीच या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन स्वतः अजित पवारांनी केले , त्याचेही स्वागत. मात्र प्रशासकीय पातळीवर या अभियानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत जे काही सुरु आहे, त्यावरून हे अभियान खरोखर हरीत महाराष्ट्रासाठी आहे का कोणत्या तरी पुस्तकातला कोणता तरी विक्रम नोंदविण्यासाठी याचा 'विवेकी' विचार करण्याची देखील आवश्यकता आहे.
----
बीड जिल्ह्यात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत एकाच दिवशी तीस लाख वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला जाणार आहे. जे आजपर्यंत कोणत्याच जिल्ह्यात झाले नाही असे काही तरी आगळे, आव्हानात्मक आणि ते देखील पर्यावरण रक्षणासाठी करण्याचे प्रशासनाला सुचले याचे स्वागतच. मागच्या दोन महिन्यांपासून या मोहिमेची आखणी आणि नियोजन सुरु आहे, त्यामुळे कागदावर याचे नियोजन उत्तम असेलच, त्याबद्दल संशय घेण्याचे काहीच कारण नाही. त्यातही या मोहिमेचा समावेश देशपातळीवरील विक्रमाच्या पुस्कात व्हावा यासाठी प्रशासनाची आखणी आहे, त्यामुळे देखील कागदावर सारी मांडणी उत्तम असणारच. २५ -२६ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात एकाच दिवशी ३० लाख वृक्ष लावायचे म्हणजे साधी गोष्ट नक्कीच नाही. त्यासाठी प्रशासनाच्या सर्वच विभागांमधील कर्मचारी, अधिकारी, सामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था, अगदी शालेय विद्यार्थी देखील झटलेच पाहिजेत, शेवटी जिल्हा आपला आहे आणि तो हरीत होणार असेल तर त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यायलाही हवेच. त्यामुळे ज्याला शक्य असेल त्याने किमान एक तरी झाड लावून या मोहिमेत सहभागी व्हायलाच हवे.
पण या मोहिमेच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर जो काही हडेलहप्पीपणा सुरु आहे, त्यावरही किमान अजित पवारांनी तरी भाष्य करायला हवे. तुती आपल्याकडे साधारणतः रेशीम उत्पादनासाठी चारा म्हणून वापरतात, तुतीला महाराष्ट्राच्या वनविभागाच्या व्याख्येत भलेही वृक्ष म्हणून बसविण्यात आले असेल मात्र वृक्षाची जागतिक पातळीवर पर्यावरणतज्ञ , वृक्षमित्र यांना मान्य असलेली व्याख्या आहे, त्या व्याख्येत तुती 'वृक्ष' म्हणून बसत नसल्याचे बहुतांश पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे, कृषी अभ्यासक तुतीला फार तर 'झुडूप' मानतात, बरे या तुतीची सातत्याने कापणी केली जाते आणि काही अपवाद वगळता तीन चार वर्षांनी शेतकरी तुती लागवडीची झाडे तोडून टाकतो. अशा तुतीची रेशीम लागवडीसाठी सात लाख झाडे लावायची आणि त्याची गोळाबेरीज 'एकाच दिवशी तीस लाख'च्या आकड्यात करायचा 'विवेकी' विचार जेव्हा मांडला जातो, त्यावेळी कोणालाही हे अभियान खरोखर हरित महाराष्ट्रासाठी आहे का 'विक्रम' नोंदविण्यासाठी असा प्रश्न पडणार असेल तर त्यात गैर काय? (अर्थात या साऱ्या प्रकारात तुती लागवडीसाठीचे नरेगा अंतर्गतचे कार्यारंभ आदेश शेतकऱ्यांना 'विनासायास' घरपोच मिळाले, हे त्यातल्या त्यात बरे). आज या सात लाख तुतीच्या वृक्षांची नोंद होईल, पण तीन वर्षांनी शेतकऱ्यांनी ही झाडे तोडल्यावर काय? हरित महाराष्ट्र संकल्पना कायमस्वरूपी वृक्षांची आहे का तात्पुरत्या इव्हेंटसाठी?
बीड जिल्ह्यात यापूर्वी वृक्ष लागवडीचे अनेक प्रयोग झाले, त्याला नागरिकांनी भरभरून पाठिंबा दिला, तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बिंदुसरा धरण ते बीड शहर या ८ किलोमीटरच्या नदी पात्राच्या दुतर्फा झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली, ६ हजार झाडे लावल्याची नोंद झाली, आज त्यातली किती झाडे शिल्लक आहेत? मागच्या दहा वर्षात नरेगा मधून वृक्ष संगोपनावर कोट्यवधींचा निधी खर्च झाला, एखादा अपवाद वगळता ती झाडे कोठे आहेत? वन विभाग, सामाजिक वनीकरण दरवर्षी वृक्ष लागवड करते, झाडे काही दिसत नाहीत, कधीतरी वनवा पेटतोच आणि झाडे म्हणे जळून जातात, या लागवडीसंदर्भाने तक्रारी झाल्या तर साधी चौकशी होत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सॉ मिल असून बेसुमार वृक्षतोड सुरूच आहे, वन विभागाने वर्षभरात किती कारवाया केल्या हे या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगता येत नाही, महामार्गाच्या कामासाठी मोठमोठी झाडे तोडली गेली, त्याचे काहीच नाही, बीड शहरात नदी काठची ५०-१०० वर्षांची झाडे भूमाफियांनी तोडली, प्रशासन काहीच करत नाही. हे सारे चित्र कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या बीडचे आहे. आज बीड शहरात नागरिकांना आठ दहा दिवसांनी पाणीपुरवठा होतो, नगरपालिका उद्या लावलेली झाडे कशी जगवणार आहे? हे सारे वास्तवदर्शी प्रश्न आहेत, पण याचा विचारच न करता केवळ एक दिवसाचा इव्हेन्ट होणार असेल तर असला नाटकीपणा अजित पवारांना तरी पटतो का? अजित पवारांच्या बारामतीमध्ये ठिकठिकाणी झाडे आहेत (त्यात तुतीचे वृक्ष कुठेच दिसले नाहीत), अनेकदा वृक्ष वाचविण्यासाठी रस्ता वळविला आहे, त्यामुळे आज बारामती राज्यात आदर्श आहे, अजित पवारांच्या बीडच्या पालकमंत्रीपदाच्या काळात खरोखर ते होणार आहे का? तीस लाखाचा आकडा कसाही जमवून विक्रम नोंदविणे महत्वाचे का खरोखर किती झाडे जगू शकतील याचा वास्तव विचार मांडणे हे आता अजित पवारांनीच प्रशासनाला सांगितले तर बरे होईल.

प्रजापत्र | Wednesday, 06/08/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा