मुंबई : महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वांत कमी होणार आहेत. आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रियल आणि कमर्शियल दर कमी केले गेले. त्यावर आक्षेप घेतल्याने सगळ्याच कॅटेगरीचे दर कमी झाले आहेत. राज्यात १०० युनिटखाली विजेचा वापर करणारे ७० टक्के ग्राहक असून, त्यांना २६ टक्के दरकपात मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
आ. अभिजीत वंजारी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात वीज दर कमी करण्याबाबत कोणती उपाययोजना केली आहे, असा सवाल केला, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, औद्योगिक वीज दरासोबतच शेतकऱ्यांना होणाऱ्या विजेच्या दराची बाब निदर्शनास आणत कालबाह्य वीज मीटर बंद पडल्यानंतरही शेतकऱ्यांना लाखोंची बिले येत आहेत, याकडे लक्ष वेधले.‘मेरिट ऑर्डर डिस्पॅच’ पद्धतीने विद्युत खरेदी केली जाणार असल्यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज खरेदी केली जाते. सोलर, विंड आणि बॅटरी स्टोअरेजच्या वापरामुळे विजेच्या खरेदीची किंमत मोठ्या प्रमाणात घटली आहे. हे करार २५ वर्षांचे असल्यामुळे विजेचे दर स्थिर राहतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ८.३२ रुपये असून, तो पुढील टप्प्यात ७.३८ रुपयांवर येणार आहे. टॅरिफ ट्रू-अप प्रक्रियेमुळे वीज दर वाढणार नाहीत.
कृषी क्षेत्रातही आता स्मार्ट मीटर बसविणार
शेतकऱ्यांना गरजेनुसार १० एचपी हॉर्स पॉवरचे सोलर पंप देण्याची तयारी आहे. कृषी क्षेत्रात स्मार्ट मीटर व वीज वापरावर नियंत्रण असावे, यासाठी स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत. यामुळे शेतीसाठी नेमकी किती वीज वापरली जाते, हे समजणे शक्य होणार असून, भविष्यकालीन धोरण आखण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.