बीड-सतीश भोसले उर्फ खोक्याला बीडच्या कारागृहात जेवण आणि फोनवर बोलण्यासाठी मोबाईल दिल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवर व्हायरल झाल्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी निलंबन केले होते.अखेर ४० दिवसांच्या कालावधीनंतर आता पुन्हा एकदा 'त्या' कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करण्याचा निर्णय पोलीस अधिक्षक यांनी घेतला आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्यावर शिरूर आणि चकलांब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.खोक्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला २४ मार्च रोजी बीडच्या कारागृहात आणण्यात आले होते.यावेळी सायंकाळची वेळ झाल्याने खोक्याला कारागृहाच्या दारातच जेवण देण्यात आले.यावेळी त्याच्याभवती समर्थकांचा गरडा आणि नंतर त्याला फोनवर बोलण्यासाठी मोबाईलची दिलेली सुविधा दोन कर्मचाऱ्यांच्या अंगलट आली.याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर आल्यानंतर राज्यात याची मोठी चर्चा झाली.दरम्यान यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी कैलास खटाने आणि विनोद सुरवसे यांच्यावर कामातील हलगर्जीपणाचा ठपका ठेवत पोलीस अधिक्षक यांनी तातडीने या दोघांचे निलंबन केले होते.तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश आष्टीच्या पोलीस उपअधीक्षक यांना दिले होते.दरम्यान आता ४० दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कैलास खटाने आणि विनोद सुरवसे यांना सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी घेतला आहे.ते दोन कर्मचारी आपल्या मूळ ठिकाणी म्हणजेच चकलांबा पोलीस ठाण्यात रुजू देखील झाल्याची माहिती आहे.
९० दिवसांच्या आत निलंबन घेता येते मागे
दरम्यान पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्याशी याबाबत माहिती घेतली असता त्यांनी त्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे सांगितले असून अधिकाधिक ९० दिवसांपर्यंत हे निलंबन असते अशी माहिती दिली.९० दिवसांच्या आत निलंबन मागे घेण्याचा अधिकार देखील घटकप्रमुखांना असल्याचे त्यांनी सांगितले.