मुंबई- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणी आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कै. विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना तअटक करून शिक्षा व्हावी, याबाबत लेखी स्वरूपात निवेदन दिले.
आपल्या पत्रात धनंजय मुंडे या संपूर्ण प्रकरणात वस्तुनिष्ठ व सर्व बाजूंनी तपास केला जावा व पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील दोषींना शासन कठोर शिक्षा करेल, असे आश्वासन दिले आहे.
सदर हत्या प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्हा ढवळून निघाला असून, धनंजय मुंडे यांनी आज सकाळी विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक जोमाने तपासात सक्रिय झाली असून आतापर्यंत या प्रकरणात नऊ पैकी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अजूनही हजारो लोक केज पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसले असून न्यायासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
दरम्यान आ. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात सर्व बारकावे तपासून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

प्रजापत्र | Tuesday, 23/06/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
